शहिदांचे जीवन देशसेवेसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:30 PM2017-10-09T23:30:40+5:302017-10-09T23:31:16+5:30
नक्षल्यांच्या हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले, त्यांना जनता कधीही विसरणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल्यांच्या हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले, त्यांना जनता कधीही विसरणार नाही. या शहीद पोलीस जवानांचे कार्य देशातील युवक व जनतेला देश सेवेच्या कार्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय सांगळे यांनी केले.
८ आॅक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी जंगलात नक्षल्यांनी केलेल्या घातपातात सुमारे १७ पोलीस जवान शहीद झाले होते. शहिदांच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी नवेगाव ग्रामपंचायतीच्या आवारात शहीद स्मारक बांधण्यात आले आहे. शहीद दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ठाणेदार संजय सांगळे बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच संदीप बोरकुटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी शहीद वीर धनंजय धोटे, प्रकाश बासमवार, मिलींद रंगारी यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर जे संकट कोसळते, त्या संकटाला शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. २००९ हे वर्ष पोलिसांसाठी सर्वात घातक ठरले होते. या वर्षात सुमारे सर्वाधिक ५७ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यात सर्वात मोठी घटना म्हणून आजही नोंद असलेल्या लाहेरी घातपातात १७ पोलीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शासन व पोलीस विभागाने आजपर्यंत अनेक उपाय योजले असून हे उपाय परिणामकारक ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर नक्षल चळवळीला उतरती कळा आली असून लवकरच ती कायमची संपणार आहे, असे प्रतिपादन ठाणेदार सांगळे यांनी केले. यावेळी त्यांनी शहीद कुटुंबांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.