स्वत:ची किडनी देऊन वाचविले पतीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:20 PM2018-04-12T23:20:05+5:302018-04-12T23:20:05+5:30
सती युगात आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून राजा सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची सती सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. असाच प्रसंग कुरखेडा येथे घडला. येथील माई उर्फ उर्मिला मेश्राम यांनी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आपल्या पतीला स्वत:ची किडनी दान करून त्यांना जीवनदान दिल्याने त्या आधुनिक सावित्री ठरल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : सती युगात आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून राजा सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची सती सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. असाच प्रसंग कुरखेडा येथे घडला. येथील माई उर्फ उर्मिला मेश्राम यांनी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आपल्या पतीला स्वत:ची किडनी दान करून त्यांना जीवनदान दिल्याने त्या आधुनिक सावित्री ठरल्या आहेत.
कुरखेडा येथील शिवाजी महाविद्यालयात विज्ञान विषयाचे प्रा. अशोक मेश्राम त्यांना दोन वर्षापूर्वी उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या आजाराने ग्रासले. सुरूवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आजाराची तीव्रता वाढू लागली. नागपूर येथील तज्ज्ञांनी सुरूवातीला डायलेसिस करण्याचा त्यांना सल्ला दिला. परंतु शेवटी ६५ टक्के दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. परंतु किडनी देणार कोण, असा प्रश्न पडला. नातेवाईकांनी असमर्थता दर्शविल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता माईने स्वत:ची किडनी पतीला देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोधही झाला. परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांना डॉक्टरांची साथ लाभली. त्यानंतर नागपूर येथील डॉ. संजय कोलते व त्यांच्या चमुने किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते नुकतेच कुरखेडा येथे परतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. आधुनिक सावित्री ठरलेल्या माईच्या दातृत्त्वाची दखल घेऊन बचत गटांनी मेश्राम दाम्पत्याचा सत्कार केला.