पावसानंतर जनजीवन पूर्वपदावर
By admin | Published: September 13, 2016 01:02 AM2016-09-13T01:02:26+5:302016-09-13T01:02:26+5:30
शनिवारच्या रात्री झालेल्या संततधार पावसाने कुरखेडा तालुक्यात सती नदीला पूर आला होता.
भामरागडात मात्र पूरपरिस्थिती कायम : कुरखेडात आमदारांनी घेतली पूरग्रस्त नागरिकांची भेट
कुरखेडा/भामरागड : शनिवारच्या रात्री झालेल्या संततधार पावसाने कुरखेडा तालुक्यात सती नदीला पूर आला होता. यामुळे कुरखेडा गावातील ५० वर अधिक कुटुंबांना सुरक्षित जागी हलविण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजतानंतर पूर ओसरला व सोमवारी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. मात्र दक्षिण गडचिरोली भागातील भामरागड तालुक्याचा सोमवारीही जिल्हा मुख्यालयाशी पर्लकोटाच्या पुरामुळे संपर्क तुटलेलाच होता. भामरागडवासीयांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सती नदीला पूर आला. या पुरामुळे कुरखेडा, कोरची या तालुक्याचा संपर्क तुटला होता. रविवारी दुपारी २ वाजता आ. क्रिष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष पुराची पाहणी केली. कुरखेडातील २७ कुटुंबातील ७० व्यक्तींना इतरत्र हलविण्यात आले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था शाळेत करण्यात आली होती. स्वत: तहसीलदार, तलाठी या स्थितीवर लक्ष ठेवून होते. सायंकाळी आमदारांनीही पूरग्रस्तांना ठेवलेल्या सुरक्षित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व त्यांच्याशी चर्चा केली व पूरपिढीतांना योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कढोली परिसरात १५ तर कुरखेडा परिसरात १४ घरांची पडझड झाली आहे. लक्ष्मीपूर येथे एक गोठा पडून एक वासरू दगावला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आ. क्रिष्णा गजबे यांच्या दौऱ्याच्या वेळी कुरखेडा तालुका भाजपाध्यक्ष राम लांजेवार, पं. स. सदस्य चांगदेव फाये, विलास गोटेफोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव हे गाव चारही बाजुने नदी, नाल्याच्या पाण्याने वेढले होते. या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला होता. गरगळा नदीवरील पूल एकाबाजुने खचल्याने खेडेगाव, गरगळा, अंतरगाव, मरारटोला, चिखलधोकडा, लव्हारी, येरकडी, कोटलडोह, बिजापूर या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. चारभट्टी परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीजवळची जमीन खरडून गेली. मालेवाडा, कढोली, रामगड, पुराडा आदी गावांना सुद्धा पुराचा फटका बसला होता.
महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करून संबंधित कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पर्लकोटा नदीपुलावरून पाणीच
पर्लकोटा नदीला आलेला पूर सोमवारीही कायमच होता. रविवारी दुपारनंतर ओसरलेला पूर रविवारच्या रात्री पुन्हा पाऊस झाल्याने वाढला. त्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक बंद पडली होती. या पावसाळ्यात तीन ते चारवेळा भामरागडला पुराच्या संकटाने वेढले. त्यामुळे भामरागडवासी त्रस्त झाले आहेत.
जि. प. उपाध्यक्ष पुरात अडकले
रविवारी झालेल्या पुराचा फटका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट यांनाही बसला. जीवन नाट हे खेडेगाव परिसरात असताना अचानक सती नदीला पूर आला त्यामुळे ते अडकून पडले होते. दुपारपर्यंत खेडेगावाला बेटाचे स्वरूप आले होते. चारभट्टी परिसरातही पिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात माहिती देताना जीवन नाट म्हणाले की, मालेवाडा, रामगड, कढोली परिसरात सुद्धा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची अंशत: पडझड झाली आहे.
कढोली-वैरागड, शिरपूर-करकाडा मार्ग बंद
शनिवारपासून कुरखेडा तालुक्यात दमदार पाऊस असल्याने सती नदीला पूर आला. त्यामुळे नदीलगतच्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले. पुन्हा रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सती नदीच्या कढोली नजीकच्या पुलावर ३ फूट पाणी वाहत होते. यामुळे कढोली-वैरागड मार्ग आजही बंद होता. सती नदीच्या पुरामुळे शिरपूर-करकाडा मार्ग बंद झाला असून या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. कोरची-मालेवाडा, कुरखेडा-पुराडा हे दोन मार्ग सुरू असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
गडचिरोली शहराच्या सखल भागात साचले पाणी
शनिवारपासून व रविवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस आहे. रात्रीच्या सुमारास दमदार पावसाने गडचिरोली शहराला झोडपले. त्यामुळे कन्नमवार वॉर्ड, गोकुलनगर, आशीर्वादनगर, लांझेडा, अयोध्यानगर, रामनगर, चनकाईनगर आदी परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाहने काढावी लागली. कठाणी, वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून गोकुलनगरलगतचा तलाव भरला आहे.