येवली, गोविंदपुरात विजेचा लपंडाव
By admin | Published: July 8, 2016 01:34 AM2016-07-08T01:34:25+5:302016-07-08T01:34:25+5:30
तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येवली, गोविंदपूर गावातील वीज पुरवठा गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने खंडित होत आहे.
नागरिक त्रस्त : रात्र काढावी लागते अंधारात
गडचिरोली : तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येवली, गोविंदपूर गावातील वीज पुरवठा गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने खंडित होत आहे. तात्पुरती दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा अल्पशा पावसाने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे येवली व गोविंदपूर येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
रविवारपासून येवली भागात सायंकाळच्या सुमारास दररोज पाऊस होत आहे. या पावसामुळे येवली व गोविंदपूर गावातील वीज पुरवठा दर मिनीटांनी अनेकदा खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार गावकऱ्यांकडून प्राप्त होताच लाईनमन गावात जाऊन दुरूस्तीही करीत आहे. मात्र पुन्हा अर्ध्या तासाने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येते. मंगळवारी संपूर्ण रात्र व दिवसभर येवली गावातील वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड पंचाईत झाली.
खासदार अशोक नेते यांनी येवली गावाला खासग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. मात्र या गावात रस्ते, नाल्या, वीजपुरवठा आदींसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात नाल्याअंभावी गावांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येवली व गोविंदपूर येथे वीज पुरवठ्याची पक्की दुरूस्ती करून नागरिकांना न्याय, द्यावा, अशी मागणी येवली ग्रामपंचायतीचे सदस्य तथा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोरेश्वर भांडेकर यांनी केली आहे. गडचिरोली मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी येवली गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असेही भांडेकर यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)