डीपीवर वज्राघात; टीव्ही, फ्रिजसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या
By गेापाल लाजुरकर | Published: July 21, 2023 02:32 PM2023-07-21T14:32:17+5:302023-07-21T14:33:50+5:30
वज्राघाताने अनेक नागरिकांना नुकसान सोसावे लागले
गडचिरोली : देसाईगंज तालुक्याच्या विविध भागात गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. याचवेळी विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर वज्राघात झाला. त्यामुळे शहरातील १०० हुन अधिक लोकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे, सेटऑफ बॉक्ससह विविध वस्तूंमध्ये तांत्रिक बिघाड आला. वज्राघाताने अनेक नागरिकांना नुकसान सोसावे लागले.
हवामान विभागाने मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. वज्राघाताच्या भीतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर केली होती. सकाळी ८ वाजताच्या सुमारास आभाळ निरभ्र होते. मात्र ९:३० वाजताच्या सुमारास विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. याचवेळी मेघगर्जना झाली. अनेकदा वीज कडाडली. त्यामुळे शहरातील १०० च्या घरातील टीव्ही, फ्रिज, सेटऑफ बॉक्स, पंखे आदींमध्ये तांत्रिक बिघाड येऊन नादुरूस्त झालीत.
या नेसर्गिक आपत्तीमुळे सर्वसामान्यांना इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. वीज वितरण कंपनीच्या डीपीवर वीज कोसळल्याने शहरात संपूर्ण दिवस वीज पुरवठा खंडित होता. कदाचित विद्युत पुरवठा सुरू असता तर पुन्हा नुकसान झाले असते.
आतापर्यंचा मोठा आघात
दरवर्षीच पावसाळ्यात विजांच्या कडकडाटामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बिघाड येतो. माझ्याकडे अनेक वस्तू दुरूस्तीकरिता आणल्या जातात. मात्र गुरूवारी झालेल्या वज्राघाताचा फटका मोठा होता. दुरूस्तीला आलेल्या अनेक वस्तू जळून गेल्या. यामुळे शेकडो लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला, असे दुरूस्ती कारागिर लुटे यांनी सांगितले.