महिला मजुरांवर काेसळली वीज; १ ठार, ११ जणी जखमी

By गेापाल लाजुरकर | Published: September 20, 2024 07:05 PM2024-09-20T19:05:43+5:302024-09-20T19:06:15+5:30

दाेघी गंभीर : आरमाेरी तालुक्याच्या डार्ली येथील घटना

Lightning strike on women labourers; 1 killed, 11 injured | महिला मजुरांवर काेसळली वीज; १ ठार, ११ जणी जखमी

Lightning strike on women labourers; 1 killed, 11 injured

गडचिराेली : धान पिकाच्या शेतातील कचरा (निंदण) काढणीचे काम सुरू असताना विजेचा कडकडाट सुरू झाला. यापासून बचाव करण्यासाठी महिला मजुरांनी रस्त्यालगतच्या नागाेबा मंदिराकडे धाव घेतली; पण क्षणातच हाेत्याचे नव्हते झाले. याचवेळी वीज काेसळून १ महिला जागीच ठार तर ११ जणी जखमी झाल्या. यापैकी दाेघी गंभीर आहेत. ही घटना आरमाेरी तालुक्याच्या डार्ली येथे शुक्रवार, २० सप्टेंबर राेजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
विजया विलास गेडाम (४०) रा. नराेटी माल, असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आरमोरी तालुक्याच्या डार्ली येथील केशव लाकडे यांच्या धान शेतातील कचरा (निंदण) काढण्यासाठी तीन किमी अंतरावरील नरोटी माल येथील ११ महिला नेहमीप्रमाणे आल्या हाेत्या. सकाळपासून कचरा काढणीचे काम सुरू हाेते. दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. विजा व पावसापासून बचाव करण्यासाठी केशव लाकडे यांच्या शेतातील ११ महिला व दुसऱ्या शेतातील अन्य एका महिलेने रस्त्यालगतच्या नागोबा मंदिराच्या दिशेने धाव घेतली.

 

काही महिला मंदिरात आतमध्ये शिरल्या, तर काही महिला दरवाज्यावर बाहेरच उभ्या हाेत्या. तेवढ्यात वीज कडाडली व मंदिर परिसरातच पडली. मंदिराला लागूनच एक माेठे झाड आहे. यात मंदिराच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या विजया विलास गेडाम ह्या जागीच ठार झाल्या. तर सरिता श्रावण मडावी (५५) व संगीता प्रमोद गेडाम (२३) ह्या दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती आरमाेरी पाेलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आरमाेरी येथे पाठविला.

९ महिलांवर पीएचसीमध्ये उपचार
वीज पडून किरकाेळ जखमी झालेल्या ९ महिलांना वडधा प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

Web Title: Lightning strike on women labourers; 1 killed, 11 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.