जिल्हाभरातील व्यवहारांवर आल्या मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:31+5:30

कुठेही गर्दी होणार नाही असे कार्यक्रम टाळावेत. याशिवाय किराणा दुकान, औषधी दुकाने, गॅस वितरण, दवाखाने अशा अत्यावश्यक बाबींशी निगडीत प्रतिष्ठानांशिवाय इतर कोणतीही दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना व्यापारी वर्गाला देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून त्याची योग्य अंमलबजावणी जिल्हाभर होईल.

Limitations on transactions across the district | जिल्हाभरातील व्यवहारांवर आल्या मर्यादा

जिल्हाभरातील व्यवहारांवर आल्या मर्यादा

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवाच सुरू : आठवडी बाजार, मॉल्स, बाजारपेठा, हॉटेल्स आजपासून राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध ठिकाणच्या बाजारपेठांमधील बहुतांश दुकाने शुक्रवार दि.२० पासून बंद ठेवली जाणार आहेत. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी तसे निर्देश दिले आहेत. मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नाही. मात्र कोरोनाबाधित देशांमधून आलेले २१ जण १४ दिवसांसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ‘होम क्वॉरंटाईन’ करून ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गुरूवारी सायंकाळी येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नोवेल कोरोनो या विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच प्रत्येक नागरिकाने आरोग्य विभागाकडून मिळालेल्या सूचनानुसार योग्य ती खबरदारी न घेतल्यास कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन त्यांच्यावर उपचार करणेही कठीण होईल, असा सूचक ईशारा दिला.
कुठेही गर्दी होणार नाही असे कार्यक्रम टाळावेत. याशिवाय किराणा दुकान, औषधी दुकाने, गॅस वितरण, दवाखाने अशा अत्यावश्यक बाबींशी निगडीत प्रतिष्ठानांशिवाय इतर कोणतीही दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना व्यापारी वर्गाला देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून त्याची योग्य अंमलबजावणी जिल्हाभर होईल. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास बळजबरीने बंद करावे लागेल. तशी वेळ येणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भर उन्हात राहून बँक ग्राहकांनी भरले पैसे
गडचिरोली शहरातील बँक आॅफ इंडियात गर्दी टाळण्यासाठी एकावेळी केवळ पाच ग्राहकांना बँकेच्या कार्यालयात प्रवेश दिला जात होता. बँकेचा मुख्यद्वार बंद करून त्यावर सुरक्षा रक्षक तैनात केला होता. सदर सुरक्षा रक्षक ग्राहकांना बँकेत सोडत होता. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ग्राहकांची मोठी रांग लागली होती. एक ते दोन तासानंतर ग्राहकांचा नंबर लागत होता. तोपर्यंत ग्राहकांना कडक उन्हात उभे राहावे लागत होते. बँकेने ग्राहकांना बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुध्दा केली नव्हती. ज्या ग्राहकाला तहाण लागेल, तो ग्राहक सुरक्षा रक्षकाकडून ग्लासभर पाणी मागून पीत होता. ग्राहकांना सावली व्हावी, यासाठी ताडपत्री सुध्दा लावली नव्हती. बँकेच्या या संवेदनाशुन्य प्रकाराबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या सर्व प्रकाराबाबत लोकमतने बँक व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव यांना विचारणा केली असता, बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून आजच निर्देश प्राप्त झाले. त्यामुळे वेळेवर ताडपत्री व पाण्याची व्यवस्था करता आली नाही. शुक्रवारी ताडपत्री व पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले.

रूग्णालयातील बहुतांश रूग्णांच्या तोंडावर मास्क
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मास्क घालणे हा प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक महत्त्वाचा उपाय आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात दरदिवशी गर्दी उसळते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक राहते. मात्र उपचारासाठी रूग्णालयात जावेच लागत असल्याने बहुतांश रूग्ण तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधून आलेल्या स्थितीत आढळून आले. सर्दी खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास सदर रूग्णाची तपासणी करण्यासाठी बाह्यरूग्ण विभागात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Limitations on transactions across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.