१५ जूनपर्यंत आधार लिंक करा
By admin | Published: June 3, 2017 01:11 AM2017-06-03T01:11:08+5:302017-06-03T01:11:08+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांसाठी विविध लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत.
आरमोरीत बैठक : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांसाठी विविध लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमधील सबसिडीचा लाभ घ्यायचा असले तर प्रत्येकाने आधार क्रमांक योजना व सबसिडी घेत असलेल्या योजनेमध्ये लिंक करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांचे १५ जूनपर्यंत १०० टक्के आधार लिंक करावे, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी चांदूरकर यांनी बुधवारी आरमोरी येथे घेतलेल्या बैठकीत दिले.
बैठकीला तहसीलदार यशवंत धाईत, पुरवठा नियंत्रण अधिकारी अप्पासाहेब पाटील, पुरवठा निरीक्षक युवराज बोरकर उपस्थित होते. राज्यात स्वस्त धान्य देण्याचे काम पॉस मशीनमार्फत सुरू असून राज्यात गडचिरोली जिल्ह्यापासून सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पॉस मशीनने रेशन वाटप यशस्वीरित्या झाल्याने सरकारने राज्यात पॉस मशीन वाटून रेशनिंगचे धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. यात ९० टक्क्यांच्या वर आधार लिंक झाले आहे. मात्र काहींचे आधार लिंक झाले नसल्याने त्यांना १५ जूनपर्यंत आधार क्रमांक लिंक करून घेणे अनिवार्य राहील. जी व्यक्ती आधार क्रमांक देणार नाही, अशा व्यक्तीचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल, अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी चांदुरकर यांनी स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल परवानाधारकांना केली. राज्य शासनाने केशनिंग धान्य वाटपासाठी प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक लिंक करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यामुळे सुटलेल्या लाभार्थ्यांचे आधार लिंकिंगचे काम जोरात सुरू आहे. बैठकीला तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार दादाजी माकडे, अनिल किरमे, नितेश नखाते, रवी निंबेकार, नादीर लालानी, बगमारे, केरोसीन विक्रेते चंदू वडपल्ली, रमेश सरोदे, तेजराव चिलबुले उपस्थित होते.