धानोरा व आष्टीतील बँक ग्राहकांना लिंकफेलचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:44 PM2019-07-06T23:44:33+5:302019-07-06T23:45:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना बँकेत ताटकळत बसावे लागले.
धानोरा येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. संपूर्ण तालुक्यातील नागरिक याच बँकेत येत असल्याने या बँकेत दिवसभर ग्राहकांची गर्दी राहते. शुक्रवारी सकाळपासूनच बँकेची लिंक फेल असल्याने कोणतेच व्यवहार दिवसभर झाले नाही. लिंक येईल व आर्थिक व्यवहार सुरू होतील, या अपेक्षेने ग्राहक दिवसभर थांबले. मात्र लिंक सुरू झाली नाही. आर्थिक व्यवहारही झाले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. काही नागरिक पीक कर्जाचे पैसे व इतर कामासाठी बँकेत आले होते. मात्र काम न झाल्याने आल्यापावली परत जावे लागले. एसबीआयचे एटीएम मागील तीन दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेतच जावे लागत आहे. बँकही काम करीत नसल्याने नागरिक निराश झाले. पेंढरी, कोटगूल, गोडलवाही, मुंगनेर, झाडापापडा या ग्रामीण भागातून अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी आले होते. काही नागरिक केवायसी फार्म भरणे व इतर कामासाठी थांबले होते. ४० ते ५० किमी वरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
धानोरा तालुक्यात बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे ५० ते ६० किमी अंतरावरून नागरिकांना बँक व्यवहारांसाठी धानोरा येथे यावे लागते. विविध योजनांचे पैसे बँकेत जमा केले जातात. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी धानोरा येथे आल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र लिंक फेल व इतर कारणांमुळे नागरिकांची बँकेची कामे होत नाही.
आष्टीतील ग्राहक आल्यापावली रिकाम्या हाताने परतले
चामोर्शी तालुक्यातील आष्टी हे मोठे व मध्यवर्ती गाव आहे. अनेकांचे बँक खाते येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. शुक्रवारी पैसे काढण्यासाठी बँकेत मोठी गर्दी झाली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. पावसाळ्यात शेतकरी, विद्यार्थी, पगारदार वर्ग यांची बँकेत गर्दी होती. मात्र लिंक फेल राहत असल्याने आर्थिक व्यवहार होत नसल्याचा अनुभव अनेकवेळा नागरिकांना येतो. पैसे खर्च करून बसने आलेल्या वृध्द नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.