तेलंगणातून येणारी दारू सीमेवरच पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:08 AM2019-04-08T00:08:16+5:302019-04-08T00:09:05+5:30
तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आणली जाणारी सुमारे दोन लाख रूपये किमतीची ६० पेट्या दारू तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहे. सदर कारवाई गडचिरोली-तेलंगणा राज्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आणली जाणारी सुमारे दोन लाख रूपये किमतीची ६० पेट्या दारू तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहे. सदर कारवाई गडचिरोली-तेलंगणा राज्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिरोंचाजवळील गोदावरी नदीच्या पुलावर तेलंगणा व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके बसविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणात जाणाऱ्या व तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची दोन्ही नाक्यांवर कसून तपासणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान आहे. या मतदानासाठी तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारू पोहोचवली जात आहे, अशी गोपनीय माहिती कालेश्वरम पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार सीमारेषेजवळ पाळत ठेवण्यात आली. तेलंगणा राज्यातून एचएच ३३- ७५३ क्रमांकाच्या टाटा सुमोची तपासणी केली असता, या सुमात सुमारे ६० विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. दारू व वाहन जप्त करण्यात आले.
वाहनचालक व्यंकटेश व त्याचे साथीदार, किशोर, विमय्या या तिघांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी सिरोंचा येथील नागरिक असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. सदर कारवाई महादेवपुरम पोलीस स्टेशनचे पीएसआय रणजितकुमार व कालेश्वरम पोलीस मदत केंद्राचे पीएसआय श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.