दारू विक्रेत्या महिलेकडून १४० बाटल्या केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:26 AM2019-07-27T00:26:23+5:302019-07-27T00:30:57+5:30
दारूविक्री करीत असलेल्या महिलेच्या घरी धाड मारून मुक्तिपथ गाव संघटनेने देशी दारूच्या १४० बाटल्या जप्त केल्या. तालुक्यातील वासाळा येथे ही कारवाई मंगळवारी केली. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटकही केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : दारूविक्री करीत असलेल्या महिलेच्या घरी धाड मारून मुक्तिपथ गाव संघटनेने देशी दारूच्या १४० बाटल्या जप्त केल्या. तालुक्यातील वासाळा येथे ही कारवाई मंगळवारी केली. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटकही केली.
वासाळा हे गाव दारूविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. येथील पुरुषच नाही तर महिलाही दारू विक्रीचा व्यवसाय करतात. गाव संघटनांनी विक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही विक्रेते छुप्या मार्गाने दारूची विक्री करीतच आहे. निशा मेश्राम दारूची विक्री करीत असल्याची माहिती गाव संघटनेच्या लोकांना मिळाली. गाव संघटनेने तिच्या घरी धाड मारून दारूसाठा जप्त केला. तसेच आरमोरी पोलिसांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दारूच्या १४० बाटल्या ताब्यात घेत मोका पंचनामा करून महिलेवर गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेला गावातून हद्दपार करण्याची मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली.
या कारवाईत येथील महिला पोलीस पाटील देखील सहभागी झाली होती. याच रात्री गावातील पोलीस पाटलाच्या मुलाशी वाद घालून त्याला भर रस्त्यात मारहाण केली. यात त्याला बरीच दुखापत झाली. या प्रकरणी पोलीस पाटील यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. या महिलेमुळे गावाचे सामाजिक आरोग्य बिघडत असल्याने सदर दारूविक्रेत्या महिलेवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.