दारुविक्रेत्यास तीन वर्षे सश्रम कारावास, २५ हजार दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:59 PM2024-04-13T18:59:00+5:302024-04-13T18:59:50+5:30
तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली.
गडचिरोली : जिल्ह्यात बंदी असतानाही दारुची तस्करी करणाऱ्या आरोपीला चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांनी १२ एप्रिल रोजी तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तापस दिनेश मल्लीक (रा.नवग्राम ता.चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२० रोजी तो स्वत:च्या घरी मोह फुलाची दारु विक्री करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली. घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये अवैध रित्या दहा लिटर मोह फुलांची दारु मिळून आल्याने चामोर्शी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हवालदार आर. डी. पिल्लेवान यांनी तपास करुन प्रथमवर्ग न्यायालयात आरोपीविरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अन्वये दोषारोपपत्र सादर केले.
फिर्यादी व ईतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तापस दिनेश मल्लीक याला दोषी ठरविण्यात आले. त्यास तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता एस. एम. सलामे यांनी युक्तिवाद केला. अंमलदार टी. आर. भोगाडे यांनी कोर्ट पैरवी म्हणून त्यांना सहाय्य केले.