पावणेतीन लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:02 AM2018-09-14T00:02:21+5:302018-09-14T00:02:41+5:30
देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
सफेद रंगाच्या मारूती चारचाकी वाहनातून बाहेर जिल्ह्यातून देसाईगंज येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तुकूम वॉर्डात सापळा रचून पाळत ठेवले. दरम्यान चारचाकी वाहन येताना दिसले. या वाहनाला थांबविले असता, दारूची वाहतूक करणारे आरोपी वाहन जागीच ठेवून घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी सदर वाहनाची चौकशी केली असता, वाहनातून ७४ हजार रूपये किमतीची विदेशी दारू, तसेच २ लाख ५ हजार रूपयांची देशी दारू आढळून आली. दारू वाहतुकीसाठी वापर करण्यात आलेले चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रूपये आहे. देशी-विदेशी दारूसह वाहन असा एकूण ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर, पोलीस हवालदार अलोने, पोलीस शिपायांनी केली. याा प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मांडवकर करीत आहेत.
दारूची वाहतूक वाढण्याची शक्यता
गुरूवारपासून गणेश उत्सवाला सुरूवात झाली. या उत्सवादरम्यान बाहेर जिल्ह्यातून दारूची वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: सीमावर्ती तालुक्यातील पोलिसांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा केला जातो. विशेषत: रात्रीच्या सुमारास पुरवठा होत असल्याने पोलिसांचा भार अधिक वाढणार आहे. विशेषत: गणेश विसर्जनाच्या दिवशी मद्यपींकडून दारूची अधिक मागणी असते. छुप्या पद्धतीने दारूची आवक करून अधिकाधिक नफा कमविण्यासाठी दारू विक्रेते मद्यपींना दारूची विक्री करीत असतात.