साक्षर भारत अभियान : हजारो नागरिक झाले साक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:19 AM2017-09-09T00:19:42+5:302017-09-09T00:23:53+5:30
साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
निरक्षर व्यक्तीला दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशातील एकही व्यक्ती निरक्षर राहू नये, एवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिकाला सुध्दा वाचता, लिहिता यावे, यासाठी भारत सरकारने ‘साक्षर भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन प्रेरक नेमण्यात आले आहेत. सदर प्रेरक गावातील नागरिकांना शिकविण्याचे काम करतात. या प्रेरकांना मासिक दोन हजार रूपये मानधन शासनाकडून दिले जाते. मार्च व आॅगस्ट महिन्यात वर्षातून दोन वेळा दरवर्षी निरक्षरांची परीक्षा घेतली जाते.
यावर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हाभरातील ७ हजार ३४७ नागरिकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ७ हजार १५९ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर पेपर तपासणीसाठी डायटकडे पाठविण्यात आले आहेत. डायट स्तरावर या प्रश्नपत्रिकांची तपासणी झाल्यानंतर प्रत्येक परीक्षार्थीला पडलेले गुण जिल्हास्तरावरील निरंतर शिक्षण विभागाकडे तपासण्यासाठी पाठविले जातात. सदर गुण पुणे येथे पाठविले जातात. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना साक्षर भारत अभियान अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. गडचिरोली जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के आहे. जवळपास अडीच लाख नागरिक अजुनही निरक्षर आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्या कालावधीनंतरही साक्षर भारत मिशन अंतर्गत परीक्षा देणाºया परीक्षार्थींची संख्या कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे.
सात वर्षांत सव्वा लाख नागरिकांची परीक्षा
मागील सात वर्षांत १ लाख ११ नागरिकांनी परीक्षा देऊन साक्षर होण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी ८ ते १० हजार नागरिक परीक्षा देतात. निरंतर शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये ११ हजार ४०५ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. २०१२ मध्ये १० हजार ९८४, २०१३ मध्ये २० हजार ४९७, २०१४ मध्ये ६ हजार १५१, २०१५ मध्ये १३ हजार ४३५, २०१६ मध्ये २९ हजार ५६० नागरिकांनी परीक्षा दिली आहे. मार्च २०१७ मध्ये २१ हजार ४७९ नागरिकांनी साक्षरतेची परीक्षा दिली आहे.
प्रेरक नावापुरतेच
प्रत्येक प्रेरकाला दोन हजार रूपये मानधन दिले जात आहे. मात्र प्रेरक नागरिकानां न शिकविताच केवळ मानधन लाटत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत.
तालुकानिहाय परीक्षार्थी
तालुका परीक्षार्थी
गडचिरोली ५५७
धानोरा ९९०
आरमोरी ६२३
देसाईगंज ३९४
कुरखेडा ७६३
कोरची ५२४
चामोर्शी ११३६
मुलचेरा २९४
एटापल्ली ४८६
भामरागड २०७
अहेरी ५६७
सिरोंचा ६१८
एकूण ७१५९