मनरेगाच्या कामावर आढळला जिवंत हातबॉम्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:53 AM2018-05-25T00:53:08+5:302018-05-25T00:53:08+5:30
कोकडीनजीकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेले हॅन्डग्रेनेड आला.
गडचिरोली : मनरेगाअंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपली जिवंत हातबॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली असली, तरीही कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
कोकडीनजीकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेले हॅन्डग्रेनेड आला. त्याने कुतूहलाने ते हाती घेऊन पाहिले. पण काही न समजल्याने त्याने पिशवी बाजूला फेकून दिली. सुदैवाने तो बॉम्ब फुटला नाही. काही वेळाने मजुरांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामरोजगार सेवकाला याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला़ हा बॉम्ब नेमका तेथे कोणी ठेवला, याची चौकशी सुरू आहे़