बसस्थानकातील लाइव्ह लाेकेशन सिस्टीम पडली अल्पावधीतच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:56+5:302021-07-07T04:44:56+5:30
बसस्थानकात येणारा प्रत्येक प्रवासी त्याच्या गावाकडे जाणारी बस फलाटावर केव्हा लागणार याची तपासणी चाैकीत करतो. प्रत्येक प्रवासी माहिती विचारत ...
बसस्थानकात येणारा प्रत्येक प्रवासी त्याच्या गावाकडे जाणारी बस फलाटावर केव्हा लागणार याची तपासणी चाैकीत करतो. प्रत्येक प्रवासी माहिती विचारत असल्याने चाैकीतील कर्मचारीही त्रस्त हाेतात. यापासून सुटका करण्यासाठी एसटीने वर्षभरापूर्वी व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) व पीआयएस (पब्लिक इन्फाॅर्मेशन सिस्टीम) गडचिराेली आगारात सुरू केली. यातील व्हीटीएस सुरू आहे. मात्र पीआयएस प्रणाली अल्पावधीतच बंद पडली. ही प्रणाली दुरुस्ती करण्याकडे एसटी प्रशासन दिरंगाई करीत असल्याने नागरिकांना पुन्हा चाैकीतच जाऊन विचारणा करावी लागत आहे. ही प्रणाली दुरुस्त करावी, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.
बाॅक्स
ब्रेकरवरून एसटी उसळली तरी हाेते नाेंद
-गडचिराेली आगारातील सर्व १०३ बसगाड्यांना व्हीटीएस प्रणाली वर्षभरापूर्वी बसविण्यात आली आहे. यासाठी वाहनाला डिव्हाइस बसविण्यात आले आहे. तर अधिकाऱ्यांकडे ॲप आहे. यात आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर ॲप ओपन हाेते.
-ही प्रणाली एसटीसाठी अतिशय फायद्याची ठरत आहे. यामध्ये बस नियाेजित मार्गाने जात आहे काय, अनधिकृत थांब्यावर बस थांबली काय, एखाद्या थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही काय, रफ ड्रायव्हिंग, गाडी उशिरा साेडण्यात आली. जाेराने ब्रेक दाबणे, वाहन रेस करणे, सतत दहा मिनिटे वाहन निर्धारित स्पीडपेक्षा अधिक स्पीडने चालविणे याची नाेंद केली जाते. वाहन सध्या काेठे आहे याची माहिती अधिकाऱ्याला मिळते.
- ही प्रणाली एक वर्षापूर्वी गडचिराेली आगारातील सर्वच वाहनांना लावण्यात आली. ही प्रणाली आताही व्यवस्थित काम करीत आहे.
बाॅक्स
चालकांच्या निष्काळजीपणाला चाप
व्हीटीएस प्रणालीमुळे चालकाच्या प्रत्येक चुकीची नाेंद केली जाते. एखादा वाहनचालक अधिकच्या चुका करीत असेल तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे वाहनचालक फारशी चूक करण्यात तयार हाेत नाही. परिणामी प्रवाशांचा जीव सुरक्षित राहण्यास मदत हाेते.
बाॅक्स
पीआयएसमुळे लाेकेशनही कळत हाेते
-पीआयएस प्रणालीत बस कधी फलाटावर लागणाार आहे, याची माहिती टीव्हीच्या स्क्रीनवर दिसते. त्यामुळे प्रवाशाला चाैकीत जाऊन विचारणा करण्याची गरज नाही.
- या प्रणालीची जवळपास ३ किमीची रेंज आहे. दुसऱ्या आगाराची काेणतीही बस या क्षेत्रात येताच ती बस आगारात किती वेळात पाेहाेचेल याची माहिती या प्रणालीमुळे मिळते.
बाॅक्स
टीव्ही धूळखात
पीआयएस प्रणालीचा टीव्ही बसस्थानकात लावण्यात आला आहे. मात्र ही प्रणाली अगदी काही दिवसांतच बंद पडली. त्यानंतर काेराेनाचे संकट एसटीवर काेसळले व या प्रणालीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. टीव्ही आता धूळखात पडून आहे.
काेट
पीआयएस प्रणाली अतिशय चांगली आहे. काेराेनामुळे ही सिस्टीम दुरुस्तीस थाेडा विलंब झाला. लवकरच ती दुरुस्त केली जाईल. व्हीटीएस सिस्टीम मात्र अतिशय व्यवस्थित काम करीत आहे.
- मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली