खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:54 PM2017-09-20T23:54:47+5:302017-09-20T23:55:03+5:30
खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्हाभरात सरासरी १५ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आहे.
गेल्या २४ तासात सर्वाधिक ६०.८ मिमी पाऊस कोरची तालुक्यात झाला आहे. कुरखेडा, आरमोरी, धानोरा, देसाईगंज या तालुक्यात २० ते २५ मिमीदरम्यान पाऊस झाला. सिरोंचात बुधवारी सकाळपर्यंत पाऊस नसला तरी दोन दिवसांपूर्वी या भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. आरमोरी, कोरची आणि कोटगुल या मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. आरमोरी तालुक्यातील वैलोचना नदीला पूर आल्याने एक मार्ग बंद झाला आहे. मात्र इतर कुठेही नुकसान किंवा मार्ग बंद होण्याच्या घटना नाहीत.
यावर्षीचा आतापर्यंतचा पाऊस ९६०.३ मिमी असला तरी तो या तारखेपर्यंत पडणाºया सरासरी पावसाच्या तुलनेत ७४.९ टक्केच आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत सरासरीच्या तुलनेत १०७.८ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सध्या हलक्या धानाचे पीक निसवण्याच्या स्थितीत आहे तर काही निसवले आहे. मध्यम धान गर्भावस्थेत तर जड धानाला आणखी काही कालावधी लागणार आहे. सर्व धानाला आणखी ३ ते ४ वेळा पाणी मिळण्याची गरज आहे. पाऊस योग्य वेळी आल्यास धानाला धोका राहणार नाही. मात्र यानंतर पावसाने धोका दिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. सदर पावसाने धानपीकावर आलेला रोग काही प्रमाणात नाहीसा झाला आहे.
धानोरा तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने येरकड-मालेवाडा मार्गावरील इरूपढोडरी नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच इरूपढोडरी-सायगाव-मुस्का मार्गावरील तळेगाव नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. धानोरा तालुक्यात ४० मिमी पाऊस झाल्याची नोंद झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली असून धानोराचे बीडीओ टिचकुले यांनी येरकड-मालेवाडा मार्गावर येऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.
खतासाठी वडसा रेल्वे स्थानकात रॅक पॉईट
वडसा रेल्वे स्थानकाच्या कामामुळे दोन वर्षांपासून बंद असलेला तेथील रॅक पॉईंट खासदार अशोक नेते, कृषी सभापती नाना नाकाडे यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे. दोन दिवसात वडसा स्थानकात खताची रॅक येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना लागणाºया युरिया खताची गरज भागविण्यासाठी गोंदिया-चंद्रपूर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. खरीब हंगामाची सोय इकडून-तिकडून केली असली तरी रबी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वडसाच्या रॅक पाईंटवरून युरिया उपलब्ध करणे सोपे जाईल, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी एस.डी.पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वैरागड-मानापूर मार्ग बंद
वैरागड : मंगळवारच्या रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारीही आपला वेग कायम ठेवला. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी तुडूंब भरून पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बुधवारी सकाळपासूनच पूर्णत: बंद झाला आहे. मंगळवारच्या रात्रीपासून दमदार पाऊस होत असल्याने वैरागड भागातील धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. अल्पमुदतीच्या धानपिकांना या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. यापूर्वी आटोपलेल्या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे पाण्यासाठी शेतकºयांची बरीच तारांबळ उडाली होती. मिळेल त्या साधनांनी शेतकरी आपल्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करीत होते. जलसाठे कोरडे असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. दरम्यान मंगळवारपासून सुरू झालेल्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दमदार पावसाने शेतकरी आनंदी झाला आहे. २० व २१ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेष म्हणजे कमी मुदतीच्या धानपिकाला केवळ एका पावसाची आवश्यकता होती, त्यामुळे हा पाऊस या धानपिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. पावसामुळे जलसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी वैरागड भागात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने वैलोचना नदीच्या पुलावर पाणी होते. परिणामी मार्ग बंद होऊन वाहतूक ठप्प झाली होती.