पोलिसांच्या मदतीने गरोदर मातेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:24 AM2017-07-21T01:24:43+5:302017-07-21T01:24:43+5:30
तालुक्यातील आसावंडी येथील गरोदर माता सिंधू सुधाकर वड्डे हिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. तिला कोटमी येथील उपकेंद्रात
आसावंडीच्या महिलेची कसनसुरात प्रसुती : कोटमीत पोहोचली रूग्णवाहिका
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील आसावंडी येथील गरोदर माता सिंधू सुधाकर वड्डे हिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. तिला कोटमी येथील उपकेंद्रात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टर नसल्याने पोलिसांनी कसनसूर येथील रूग्णवाहिका बोलावून तिला कसनसूर येथे तत्काळ भरती केले. कसनसूर येथे सिंधूची प्रसुती झाली.
सिंधू वड्डे ही सहा महिन्यांची गरोदर होती. १४ जुलै रोजी अचानक तिला उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ती अशक्त होऊन बेशुध्द झाली. आसावंडीतील ग्रामस्थांनी तिला खाटेवर टाकून आरोग्य उपकेंद्र कोटमी येथे भरती केले. या ठिकाणी परिचारिका हलामी व बोरकर उपस्थित होत्या. त्यांनी प्राथमिक उपचार सुध्दा केले. मात्र या ठिकाणचे डॉक्टर नव्हते. त्यामुळे सदर महिलेला प्रसुतीसाठी कसनसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करणे आवश्यक होते. कोटमी येथे एकही चारचाकी वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सिंधूला कसनसूर येथे न्यायचे कसे, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबतची माहिती कोटमी पोलीस मदत केंद्राचे पोळ यांना दिली असता, त्यांनी उपपोलीस स्टेशन कसनसूर येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व कोटमी येथे डॉक्टर व रूग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. कसनसूर येथून डॉक्टर साबने हे रूग्णवाहिका घेऊन कोटमी येथे आले. तिला रूग्णवाहिकेने कसनसूर येथे नेल्यानंतर प्रसुती केली. मात्र बाळ कमी दिवसाचे असल्याने त्याला वाचविण्यात यश आले नाही. प्रसूत माता मात्र सुखरूप आहे. कोटमी आरोग्य उपकेंद्राला पूर्णवेळ डॉक्टर देण्याची मागणी आहे. या उपकेंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने दुर्गम भागातून उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे हाल होत आहेत.
नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांना इतर कामातही मदत करण्याचे काम कोटमी पोलीस मदत केंद्रातील पोलीस जवान व पोलीस अधिकारी करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.