निवडणूक प्रचारातून स्थानिक मुद्दे गायब; शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 03:52 PM2024-11-14T15:52:23+5:302024-11-14T15:53:44+5:30

रणधुमाळी : सत्ताधाऱ्यांकडून योजनांचे मार्केटिंग, विरोधकांकडून महागाईवर बोट

Local issues missing from election campaigns; Speed up the campaign in the last phase | निवडणूक प्रचारातून स्थानिक मुद्दे गायब; शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग

Local issues missing from election campaigns; Speed up the campaign in the last phase

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप- प्रत्यारोप, बैठका, फेऱ्या, जाहीर सभांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह स्टार प्रचारकांकडून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मुद्यांनाच ढाल बनवले जात आहे. सत्ताधाऱ्यांचा भर योजनांच्या प्रचार, प्रसारावर दिसतो तर विरोधकांकडून महागाईसारख्या प्रश्नांवर बोट ठेवले जात आहे.


आरमोरी, गडचिरोली, अहेरी मतदारसंघांत यंदा अटीतटीची लढत आहे. मातब्बर नेत्यांसह नवख्यांचा कस लागला आहे. यानिमित्ताने शहरासह गावखेड्यांमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचाराचा धुरळा उडत आहे, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. शिवाय दुर्गम, अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची अक्षरशः धावपळ उडत आहे. स्टार प्रचारकांसह दिग्गज नेत्यांच्या सभा घेऊन वातावरण अधिक पोषक करण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असल्याचे पहावयास मिळत आहे.


रुसवे-फुगवे संपेनात; कोणाला बसणार फटका ? 
निवडणूक शेवटच्या टप्प्यात असतानाही महायुती व महाविकास आघाडातील रुसवे-फुगवे काही संपायला तयार नाहीत. मित्रपक्षांचे काही पदाधिकारीही प्रमुख उमेदवारांसोबत दिसत नाहीत. त्याचा फटका कोणाला बसतो, त्यांची ऐनवेळी काय भूमिका राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


अहेरी क्षेत्रात जोरदार रस्सीखेच
अहेरी मतदारसंघातील लढत अधिक चर्चेत आहे. एकेका मतासाठी तेथे जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला करणाऱ्या या निवडणुकीकडे विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेले आहे. फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोप व व्हिडीओ-ऑडिओ वॉर यामुळे तेथील राजकीय वातावरण अधिक गरम आहे


शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग
प्रचारासाठी जेमतेम पाच दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी, महायुतीत बंडखोरी काहींना अडचणीची, काहींना सोयीची झाली आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या टप्प्यात कोण कोणाची मते खेचतो, कुठले मुद्दे अधिक चर्चेत येतात, लोकांची मने कोण कशा पद्धतीने वळवतो यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे.


हे मुद्दे अधिक चर्चेत

  • लाडकी बहीण योजना
  • शेतकरी सन्मान योजना 
  • महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास
  • ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
  • अयोध्येत राम मंदिर उभारणी 
  • संविधान बदलाची चर्चा
  • जातनिहाय जनगणना 
  • ओबीसी आरक्षण
  • आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी 
  • हिंदुत्ववाद 
  • शहरी नक्षलवाद


कोणत्या प्रमुख मुद्यांना प्रचारात बगल

  • वनहक्क पट्ट्यांचा मालकी हक्क
  • गडचिरोलीतील बाह्यवळण रस्त्याचे रुंदीकरण 
  • पूरग्रस्त भागातील गावांचे स्थलांतर 
  • पूर व्यवस्थापन आराखडा 
  • अभियांत्रिकी, विधी महाविद्यालय निर्मिती
  • अहेरी, सिरोंचात उच्चशिक्षण सुविधा 
  • सिंचनासाठी नवे प्रकल्प 
  • वनउपजावर आधारित उद्योगांना चालना 
  • पर्यटन विकास 
  • कौशल्य शिक्षणाच्या संधी 
  • रोजगारासाठी उद्योग निर्मिती

Web Title: Local issues missing from election campaigns; Speed up the campaign in the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.