राजगोपालपूर शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:11 AM2018-07-28T00:11:48+5:302018-07-28T00:12:15+5:30

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत राजगोपालपूर येथील जिल्हा परिषद शाळेला स्थायी शिक्षक देण्यात यावा, या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकले आहे.

Locked up Rajgopalpur school lock | राजगोपालपूर शाळेला ठोकले कुलूप

राजगोपालपूर शाळेला ठोकले कुलूप

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकांच्या मागण्यांसाठी ग्रामस्थ संतप्त : पाच वर्गासाठी एकच शिक्षक कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत राजगोपालपूर येथील जिल्हा परिषद शाळेला स्थायी शिक्षक देण्यात यावा, या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकले आहे.
तालुक्यातील येनापूर केंद्राअंतर्गत येत असलेल्या राजगोपालपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवी वर्ग असून ५९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सत्र सुरु झाल्यापासून प्रशासनाच्या वतीने एकही शिक्षक देण्यात आलेला नसल्याने मुले वाऱ्यावर सोडली जात आहेत. काही दिवसापूर्वी प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था होण्याच्या दृष्टीने चांदेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सी.पी. कुबरे यांची नियुक्ती केली. त्यांना राजगोपालपूरला दिल्यानंतर चांदेश्वर येथील शाळेत शिक्षकांचा अभाव दिसून येत आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी स्थायी स्वरूपाचा शिक्षक द्यावा, अशी मागणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडे केली. दरम्यान आपण दोन दिवसात शिक्षक देऊ, अशी ग्वाही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी १० जून ला दिलेली होती. परंतु आता १५ दिवस होऊनही अजूनपर्यंत एकही शिक्षक न दिल्याने गावकऱ्यांनी सरपंच शिलाताई गोहणे, शाळाव्यवस्थापन अध्यक्ष बंडू आभारे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. एस.बी. कोडापे, रामदास नेव्हारे, साईनाथ सिडाम, दिलीप शेडमाके, गीता नेव्हारे, संदीप कुंबडे, दिलीप बावणे, लीलाबाई पिंपळकर, भाऊजी राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी शाळेला कुलूप ठोकले. शिवाय शाळेची इमारत सतत गळत असल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर शौचालय नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना शौचास बाहेर जावे लागत आहे. याला जवाबदार कोण, असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या बाबत चामोर्शी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांना विचारणा केली असता आपण येत्या दोन दिवसात राजगोपालपूर जि.प. शाळेत नक्कीच शिक्षक देऊ, असे आश्वासन दिले आहे.
पालकांचा कडक इशारा
राजगोपालपूर जि.प. शाळेत प्रशासनाने शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था करू नये, या शाळेत कायमस्वरूपी स्थायी शिक्षक देण्यात यावा, या मागणीवर राजगोपालपूर येथील ग्रामस्थ, पालक व ग्रामपंचायत पदाधिकारी ठाम आहेत. स्थायी शिक्षक दिल्याशिवाय या शाळेचा कुलूप उघडणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व प्रशासनाला दिला आहे.

Web Title: Locked up Rajgopalpur school lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.