भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:25 AM2023-12-27T09:25:15+5:302023-12-27T09:25:50+5:30

सुवर्ण महोत्सव 

lok biradari prakalp journey of 5 decades unfolded by prakash amte | भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

भकास, उदास चेहऱ्यांवरील वेदनेतून लोक बिरादरीचा जन्म; प्रकाश आमटेंनी उलगडला ५ दशकांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली : कुपोषण, दारिद्र्य हे प्रश्न तर होतेच; पण आदिवासींचा विश्वास संपादन करण्याचेही मोठे आव्हान होते. रापलेल्या उदास, भकास, निस्तेज चेहऱ्यांवरील वेदना बोलक्या होत्या, यातूनच लोक बिरादरीची प्रेरणा मिळाली, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी पाच दशकांचा प्रवास उलगडला. 

अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून २३ डिसेंबर १९७३ रोजी एका झोपडीत डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्थापन केलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाला   ५० वर्षे पूर्ण झाली.  सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी हेमलकसा येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मुंबई, पुण्यासह राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून मान्यवर आले होते. या कार्यक्रमात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची निवेदक डॉ. मंदार परांजपे यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, भामरागड येथे तीन नद्यांचा संगम आहे, तो पाहण्यासाठी बाबांनी मला आणले होते. यावेळी परिसरातील गावांमध्ये भेटी दिल्या. आम्हाला बघून लोक दूर पळून जात, कोणी जवळ येण्यासही धजावत नसे. अंगावर नीटनेटके कपडे नसत, चेहऱ्यावरची निरागसता अन् दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले हे गरीब लोक पाहून अस्वस्थ व्हायला झाले.  तुम्ही डॉक्टर झाल्यावर येथे काम करावे, अशी इच्छा बाबांनी बोलून दाखविली. महाविद्यालयीन जीवनात झालेला परिचय, प्रेमविवाह यावर दोघेही भरभरून व्यक्त झाले.   डॉ. विकास आमटे, कौस्तुभ, पल्लवी, डॉ. दिगंत, डॉ. अनघा, अनिकेत आणि समीक्षा यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीय उपस्थित होते. 

प्राणी जगविण्यासाठी विचारांशी तडजोड

प्राण्यांचे अनाथालय सुरू करण्याचा प्रवासही आमटे दाम्पत्याने उलगडून दाखवला. ते म्हणाले,  आम्ही  दोघेही शाकाहारी.   प्राण्यांसाठी मांस साठवावे लागे; पण आम्ही विचारांशी तडजोड करून प्राणीप्रेम जपले. हा प्रकल्प उभारताना अनेक ज्ञात, अज्ञातांचे हात लागले, असे सांगताना ते भावुक झाले.
 

Web Title: lok biradari prakalp journey of 5 decades unfolded by prakash amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.