Lok Sabha Election 2019; दुर्गम भागापासून उमेदवार दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:42 PM2019-04-01T22:42:47+5:302019-04-01T22:43:32+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील उमेदवार कोण? असा प्रश्न छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील उमेदवार कोण? असा प्रश्न छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पडला आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा विस्तार सिरोंचा तालुक्यापासून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यापर्यंत ५०० किमीच्या घरात आहे. प्रत्येक गावात उमेदवाराला पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्ते पोहोचतील, याची व्यवस्था केली जात आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यापैकी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील काही विधानसभा क्षेत्र दुर्गम भागात मोडतात. त्या भागात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. चार ते पाच किमी अंतरावर ९ ते १० कुटुंबाची लोकसंख्या असलेले गाव आढळते. त्याचबरोबर काही गावांना जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे त्या गावांना भेट देण्यापेक्षा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील गावांना भेटी देण्यास प्राधान्य दिले जात आहे. या क्षेत्रांमध्ये दर दोन ते तीन किमी अंतरावर १०० ते २०० कुटुंबांची लोकसंख्या असलेले गाव मिळते. या गावांमध्ये पोहोचून प्रचार केल्यास कमी कालावधीत जास्त लोकांकडे पोहोचता येते. प्रचाराच्या या गणितात गडचिरोली जिल्हा मागे पडला असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करून संबंधित गावांमध्ये फिरण्याचे निर्देश उमेदवार देत आहेत.
दुर्गम भागातील काही गावांमध्ये वृत्तपत्र पोहोचत नाही. त्यामुळे नेमका कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, हे त्यांना सुध्दा माहीत नाही. त्यामुळे ऐनवेळेवर कोणत्याही उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी तरी उमेदवार आपल्या गावांपर्यंत पोहोचून आपल्या समस्या जाणून घेतील, अशी अपेक्षा दुर्गम भागातील नागरिकांना होते. मात्र आता प्रचारासाठी केवळ आठ ते नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दुर्गम गावांपर्यंत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता कमीच आहे.
समस्यांच्या पाढ्यांनी कार्यकर्ते निरूत्तर
ज्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, त्या गावात इतर सोयीसुविधा असतील काय? याचा विचार न केलेलाच बरा. अशा गावांमध्ये उमेदवार पोहोचू शकत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रचार करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. कार्यकर्ता गावात मत मागण्यासाठी गेल्यानंतर त्याला गावातील समस्यांचा पाढा वाचवून दाखविला जात आहे. पाच वर्ष उलटूनही निवडून आलेले लोक आमच्या गावाला येत नाही. त्यांचे तर सोडाच मतदानाचा दिवस उलटल्यानंतर तुम्ही कार्यकर्तेही आमच्या गावाकडे फिरकून बघत नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावकऱ्यांचे प्रश्न बघून नेमके कोणते उत्तर द्यावे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कोण आहे उमेदवार?
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकसंख्या विरळ असल्याने उमेदवार या गावांमध्ये प्रचार करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावापर्यंत पोहोचत नाही. अनेक गावातील नागरिकांना आपल्या भागात लोकसभेचे उमेदवार कोण-कोण रिंगणात आहेत, हे सुध्दा माहित नसल्याची स्थिती आहे.