Lok Sabha Election 2019; उमेदवारांनी शोधली प्रचाराची नवीन शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:24 PM2019-04-01T22:24:04+5:302019-04-01T22:24:21+5:30
लोकसभेच्या मतदानाला अवघे आठ-दहा दिवस उरलेले असले तरी निवडणूक प्रचाराला रंगत चढलेली नसल्याने मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. काही उमेदवारांनी नवीन शक्कल लढवून प्रचारासाठी काही विशेष कार्यकर्ते (प्रचारक) नियुक्त केलेले आहेत. हे कार्यकर्ते पान टपरी, चौक व ज्या ठिकाणी चार-पाच व्यक्ती गप्पा मारत बसले असतात त्याठिकाणी जाऊन आपल्या उमेदवाराबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभेच्या मतदानाला अवघे आठ-दहा दिवस उरलेले असले तरी निवडणूक प्रचाराला रंगत चढलेली नसल्याने मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. काही उमेदवारांनी नवीन शक्कल लढवून प्रचारासाठी काही विशेष कार्यकर्ते (प्रचारक) नियुक्त केलेले आहेत. हे कार्यकर्ते पान टपरी, चौक व ज्या ठिकाणी चार-पाच व्यक्ती गप्पा मारत बसले असतात त्याठिकाणी जाऊन आपल्या उमेदवाराबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणत आहेत.
सरळ प्रचार करण्याऐवजी एखाद्या विषयाला वळवून चर्चा निवडणुकीपर्यंत नेऊन पोहोचविणे व नंतर विरोधी उमेदवार लायकीचा कसा नाही व तो कमजोर कसा आहे हे पटवून सांगून आपला उमेदवार सरस कसा आहे हे पटवून देण्यात हे कार्यकर्ते तरबेज ठरत आहेत, यावरून या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे की काय? असाच भास त्यांच्या चर्चेवरून होतो.
सध्या उपहारगृहे, भोजनालय, गावाबाहेरील धाबे यांना सुगीचे दिवस आलेले आहे. दररोज सायंकाळी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष पदाधिकारी व कार्यकर्ते हे आपल्या कार्यकर्त्यांची व्यवस्था वरील ठिकाणी करीत आहेत. दिवसभर प्रचार व रात्री जेवण हा नित्यक्रम आता दररोज पहायला मिळत आहे.
विशेष कार्यकर्त्यांकडून ब्रेन वॉश झालेले उपस्थित नागरीक मग दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तेच बोलतात जे त्या विशेष प्रचारकांनी त्यांना सांगितलेले असते. यामुळे आपोआपच विनापैशाने त्यांचा प्रचार होत असतो. उमेदवारांनी लढविलेली ही नवीन शक्कल चांगली उपयोगी ठरणार आहे.
या प्रकारच्या विशेष प्रचारकांचे अनेक पथक तयार करण्यात आले असून एका पथकात तीन ते चार प्रचारकांचा समावेश आहे. हे प्रचारक एका ठराविक मानधनावर कार्य करीत असल्याचे समजते. प्रत्येक मोठ्या गावात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न
निवडणुकीत एक नवीनच फंडा अंमलात आणण्यात आला आहे आणि तो म्हणजे एखाद्या ठिकाणी बसून विशेष कार्यकर्त्यांद्वारे लोकांची मने वळविणे. हे विशेष प्रशिक्षित कार्यकर्ते ज्या ठिकाणी चार-पाच व्यक्ती एकत्र बसलेले असतात त्याठिकाणी जातात व विषयाला थेट हात न घालता हळूहळू अन्य विरोधी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या कार्याची चर्चा करून त्या अनुषंगाने उमेदवाराचा विषय छेडला जातो. आपल्या उमेदवाराची महत्ता सांगण्यास सुरुवात करून तेथे उपस्थित लोकांचे 'ब्रेन वॉश' करण्याचा प्रयत्न करतात. प्रचाराचे हे नवीन तंत्र प्रमुख राष्टÑीय पक्षांकडून अवलंबिले जात आहे.