Lok Sabha Election 2019; काँग्रेस उमेदवार उसेंडी यांच्या मालमत्तेच्या माहितीत तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 09:24 PM2019-04-07T21:24:57+5:302019-04-07T21:26:26+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. त्यांनी खोटी माहिती सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
सदर तक्रारीनुसार २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉ.उसेंडी यांनी सादर केलेल्या शपथपत्रात आपले मालमत्तेचे विवरण नमूद करताना मौजा रामपूर तुकूम, भूमापन क्र.४७ व इतर, क्षेत्र १९५.२० चौ.मी. ही जागा दि.१९ डिसेंबर २०११ रोजी स्वत: खरेदी केली. त्यावेळी त्या जमिनीची किंमत २४ लाख ५४ हजार १४५ रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. शिवाय त्या जमिनीवर विकास बांधकाम इत्यादीच्या रुपाने कोणतीही गुंतवणूक केली नसल्याचे म्हटले आहे.
परंतू २०१९ च्या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात ती जमीन १९ डिसेंबर २०११ ऐवजी दुसऱ्याच तारखेला खरेदी केल्याचे नमूद आहे. याशिवाय त्या जमिनीची खरेदीच्या वेळी असलेली किंमत २०१४ मध्ये दाखविलेल्या खरेदी किमतीपेक्षा कितीतरी कमी म्हणजे २ लाख २० हजार आणि १ लाख ९५ हजार अशी दाखविली आहे. दोन्ही निवडणुकांच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातील माहितीत असलेल्या फरकामुळे शंका उत्पन्न होत असून त्यांनी आताच्या शपथपत्रात खरेदी मूल्य कमी दाखवून संपत्ती लपविली आहे.
विशेष म्हणजे २०१४ च्या शपथपत्रात डॉ.उसेंडी यांनी मुंबईच्या वरसोवा, राजयोग बिल्डींग येथील भू.क्र.१३७४/१ क्षेत्रावरील सदनिका दि.२० एप्रिल २०११ रोजी ४२ लाख ४६ हजार रुपयांत खरेदी केल्याचे नमूद आहे. परंतू आताच्या (२०१९) शपथपत्रात त्याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे ती संपत्ती त्यांनी लपवून बनावट शपथपत्र दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे ती सदनिका त्यांनी विक्री केली असेल तर त्याबाबतचा कोणताही उल्लेख केलेला नाही. गेल्या ५ वर्षाच्या आयकर विवरणपत्रातही त्याबाबतची माहिती नाही. त्यामुळे उसेंडी यांच्यावर खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याची मागणी बांबोळे यांनी केली आहे.
मुंबईमधील तो फ्लॅट विकला आहे. त्यातून अंगावरील ७६ लाखांचे कर्ज फेडले आहे. त्यामुळे आयकर विवरण पत्रात त्याची रक्कम दिसत नसेल. फ्लॅटच राहिला नसल्यामुळे त्याबाबत आताच्या शपथपत्रात नमूद करण्यात आलेले नाही.
- डॉ.नामदेव उसेंडी, उमेदवार, काँग्रेस