Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:39 PM2019-04-08T23:39:07+5:302019-04-08T23:40:00+5:30
काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील राजे विश्वेश्वर महाराज स्टेडियममध्ये भाजपा व मित्र पक्षाच्या विजय संकल्प रॅलीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, आ.रामदास आंबटकर, जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, सभापती सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, शिवसेनेचे राजगोपाल सुलवावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनाही सांगितल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या काळात दिल्लीतून निघालेला १ रुपयातले १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचत होते. आता जनधन योजनेद्वारे १०० टक्के पैसा लोकांच्या हातात मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे ९८ टक्के लोकांकडे शौचालय आहेत. धुरमुक्त स्वयंपाकासाठी घराघरात गॅस पोहोचला आहे. या पाच वर्षात देशात सर्वच ठिकाणी वीज पोहचली असून २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळाले असेल, असे त्यांनी सांगितले.
देशात १३ कोटी लोकांना मुद्रा लोणद्वारे रोजगार निर्मितीसाठी मदत झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे दररोज जवळपास ५० कोटी लोकांना आरोग्यासाठी मदत होते. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना विम्यासोबतच शेतकरी, शेतमजूर, गवंडी, घरकाम, महिला व इतर लोकांना पेन्शनची योजना येणाऱ्या काळात करणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी ४.४३ वाजता अहेरीत पोहचले व ५.१५ वाजता नागपूरकडे उडाले. या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली होती.
१ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूर
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने आदिवासी विकासासाठी ९ टक्के निधी राखीव करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. १ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. गैरआदिवासींचे वनहक्क दावे सुध्दा लवकरच मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला. ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे. गोंडी भाषेला देशाच्या भाषा सूचित आणण्यासाठीसुद्धा पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.