Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:07 AM2019-04-13T00:07:28+5:302019-04-13T00:08:42+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. काही मतदान केंद्रावरचे कर्मचारी मुख्यालयी पोहोचणे बाकी आहेत. ते पोहोचल्यानंतरच त्यांच्या केंद्रावरील मतदानाचा आकडा घेऊन निश्चित टक्केवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नक्षल घटनांच्या पार्श्वभूमीवर वाढलेले हे मतदान लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वाढविणारे ठरले आहे.
या लोकसभा मतदार २०१४ च्या निवडणुकीत ६९.९५ टक्के मतदान झाले होते. तो आकडा यावेळी पार करून मतदान ७२ टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे. यात अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. परंतू अहेरी क्षेत्रात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसक घटनांमुळे, तसेच एटापल्ली तालुक्यात ४ मतदान केंद्र सुरूच झाले नसल्यामुळे मतदानाचे प्रमाण घटले. मतदानापासून वंचित राहिलेल्या त्या चार केंद्रांवरील नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळाल्यास या क्षेत्रातील मतदानाचा आकडा आणखी वाढू शकेल.
एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या दक्षिणेकडील चार तालुक्यांसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची, कुरखेडा या तालुक्यांतही नक्षलवाद्यांचे सावट आहे. नक्षलवाद्यांचा मतदान प्रक्रियेला विरोध असतो. तरीही त्या भागात मतदानाचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येते. यावेळी मतदानाबाबत जनजागृती करण्यातही प्रशासनाने कसर सोडली नाही. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.