Lok Sabha Election 2019; गडचिरोली जिल्ह्यातील १५ गावांत होणार दारूमुक्त निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:32 PM2019-04-06T13:32:55+5:302019-04-06T13:34:47+5:30
निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतले आहेत. ती टिकवून ठेवण्यासाठीही आमची धडपड सुरु आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे. दारूला गावात येऊच देणार नाही, असा निर्धारही महिलांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक प्रयत्न केले जात आहे. अनेक गावांनी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून गावात ठराव घेऊन दारूविक्री बंद केली आहे. ती तशीच टिकून राहावी यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारादरम्यान मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत मिळविण्याचा प्रकार उमेदवारांकडून तसेच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घडू शकतो. यासाठीच ही निवडणूक दारूमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यात आतापर्यंत कोकडी, उसेगाव, कसारी, कुरुड, झरी-फरी, किन्हाळा, विहीरगाव, पिंपळगाव, शिवराजपूर शंकरपूर, रावणवाडी, आमगाव, सावंगी, एकलपूर आणि नवीन लाडज या गावांनी सभा घेऊन निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव घेतला आहे.
गावाच्या विकासासाठी चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांची गरज आहे. तो नेता निवडण्यासाठी शुद्धीत राहून मतदान करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे दारूच्या अमिषाला बळी न पडता लोकशाहीचा अधिकार वापरणार असल्याचे मत लोकांनी व्यक्त केले आहे. बैठकीला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
महिलांचा पुढाकार
दारूमुक्त गाव संघटनेत महिलांचा पुढाकार आहे. खास करून बचत गटाच्या माध्यमातून संघटीत झालेल्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सहभाग घेत आहेत. याच महिला दारूमुक्त निवडणुकीसाठी जोरात प्रयत्न करीत आहे. नवरा दारू पितो व त्याचा त्रास आम्हा महिलांनाच होतो. त्यामुळे गावात टिकवून ठेवलेली दारूबंदी निवडणूक काळात सुरु होऊ देणार नाही, असा निर्धार गावागावात महिला व्यक्त करीत आहेत.