Lok Sabha Election 2019; निवडणुकीमुळे मजुरांना सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:19 PM2019-03-27T14:19:59+5:302019-03-27T14:22:08+5:30
गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रचार साहित्य बनविणाऱ्या कारागिरांना यामुळे काही दिवसासाठी का असेना, चांगले दिवस आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला पुढील दोन दिवसात वेग येणार आहे. गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रचार साहित्य बनविणाऱ्या कारागिरांना यामुळे काही दिवसासाठी का असेना, चांगले दिवस आले आहेत. शिवाय ग्राफिक्स, प्रिंटींग प्रेस, डेकोरेशन, वाहने आदीसह विविध साहित्य निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणार असल्याने या व्यावसायिकांची सध्या चांदी आहे. एवढेच नाही तर उमेदवारांच्या प्रचारसभेत गर्दी जमविण्यापासून तर प्रचार साहित्य वाटपापर्यंत भाडोत्री कार्यकर्ते म्हणून महिला व पुरूषांना बोलविले जाणार असल्याने आगामी ८-१० दिवस हजारो नागरिकांना रोजगार मिळणार आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्या ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही पक्षातील उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. निवडणूक प्रचारासाठी आपापल्या पक्षातील मोठे नेते, स्टार प्रचारक आदींचे बॅनर बनवून प्रचार कार्यालयाच्या आसपास लावण्यात आले आहेत.
नामांकन रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते व नागरिकांना गडचिरोलीत आणण्यात आले. यासाठी प्रमुख दोन्ही पक्षांना शेकडो वाहनांची व्यवस्था करावी लागली. ठिकठिकाणच्या प्रचार सभांसाठी अशा पद्धतीने वाहने, बॅनरची गरज भासणार आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने खासगी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्यासह तालुकास्तरावरही प्रमुख राजकीय पक्षाच्या वतीने मिनी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरील डेकोरेशन व्यावसायिकांचा धंदा आता वाढला आहे.
निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा व तालुका मुख्यालयी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने हॉटेल तसेच भोजनालय चालविणाऱ्यांचा व्यवसाय वाढला आहे. याशिवाय प्रचार कार्यालय परिसरातील चहा व्यावसायिकांनाही फुरसत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या प्रचारासाठी महिलांनाही बोलाविण्यात येणार असल्याने या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
रोहयो व इतर कामांवर परिणाम
ग्रामीण भागातील बहुतांश पुरूष व महिला रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणारे नोंदणीकृत मजूर आहेत. गेल्या महिनाभरापासून हे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. मात्र आता निवडणूक प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षाला सर्वसामान्य नागरिकांसह मजुरांचीही गरज भासणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या जिल्हा व तालुकास्तरावर प्रचारसभा होणार आहेत. या प्रचारसभेत कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी गर्दी उमेदवार तसेच पक्षश्रेष्ठींना अपेक्षित असते. त्यामुळे राजकीय पक्षातर्फे गर्दी जमविण्यासाठी महिलांना सभास्थळी बोलाविले जाते. सभेला गर्दी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना प्रतीदिवस मजुरी म्हणून २०० रुपये दिले जातात. प्रचारकार्यात बहुतांश मजूर व्यस्त राहत असल्याने रोजगार हमी व इतर बांधकामावर मजूर जात नाही. परिणामी रोहयो तसेच इतर इमारत बांधकामे निवडणूक काळात प्रभावित होणार आहेत.