Lok Sabha Election 2019; अवघ्या पाच उमेदवारांमध्ये रणसंग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:53 PM2019-03-28T23:53:13+5:302019-03-29T12:10:12+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आता ५ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. या पाचपैकी ३ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तर २ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. या लढतीत एकही अपक्ष उमेदवार नाही हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या रणसंग्रामातून ६ उमेदवारांपैकी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी माघार घेतली. त्यामुळे आता ५ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. या पाचपैकी ३ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तर २ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. या लढतीत एकही अपक्ष उमेदवार नाही हे विशेष.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस होता. काँग्रेसची अधिकृत तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून नामांकन दाखल करणाऱ्या डॉ.किरसान यांनी गुरूवारी माघार घेतली. त्यामुळे आता अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), आणि हरिचंद्र मंगाम (बहुजन समाज पार्टी) या तीन मान्यताप्राप्त (राष्ट्रीय/राज्य) पक्षांच्या उमेदवारांसह डॉ.रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी) आणि देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) या दोन नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
या उमेदवारांना गुरूवारी निवडणूक चिन्हांचेही वाटप झाले. त्यामुळे प्रचार साहित्य छपाईसाठी उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. पोस्टर्स, बॅनर्सपासून तर प्रचाराची वाहने सजवण्यापर्यंतच्या कामांना रात्रीच सुरूवात झाल्याचे दिसून येत होते.
यासाठी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना कामांचे वाटप केले. पण त्यांचे काम योग्यप्रकारे होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. उमेदवारांचा दैनंदिन खर्च आणि आचारसंहिता भंगासह इतर प्रकारच्या तक्रारींच्या तपासणीसाठी निवडणूक आयोगाचे पर्यवेक्षक दाखल झाले आहेत.
विधानसभानिहाय सोपविल्या जबाबदाऱ्या
क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या या मतदार संघात आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून मतदारांना आपल्या बाजुने वळविण्याची जबाबदारी तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. भाजपने मतदार संघातील आपल्या ५ आमदारांना ही जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेसने विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना कामी लावले आहे.
१२ दिवसात पिंजून काढावी लागणार गावे
सिरोंचा ते सालेकसापर्यंत भौगोलिककृष्ट्या राज्यात मोठ्या असलेल्या या मतदार संघात पुढील अवघ्या १२ दिवसात पोहोचून मतदारांना आपल्या बाजुने करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे आहे. प्रत्येक गावात पोहोचणे शक्य नसल्यामुळे त्यासाठी प्रसार माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर उमेदवार जोर देणार आहेत. शुक्रवारपासून वाहनांद्वारे जाहीर प्रचारालाही सुरूवात होत आहे.
महिला उमेदवार नाहीच
मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघांमिळून ७ लाख ७३ हजार ८५० महिला उमेदवार आहेत. पुरूष मतदारांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ४९.३३ टक्के आहे. असे असताना या मतदार संघात एकही महिला उमेदवार नाही. सुरूवातीला नामांकन दाखल करणाºया १० जणांमध्ये एका महिलेचा समावेश होता. परंतू त्यांचा अर्ज छाननीत रद्द झाला.