Lok Sabha Election 2019; मोटरसायकल व पायदळ रॅलींनी प्रचाराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:06 AM2019-04-10T00:06:12+5:302019-04-10T00:07:18+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासीयांना शेवटचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासीयांना शेवटचे आवाहन केले. काँग्रेसतर्फे मोटारसायकलवरून तर भाजपने पायदळ रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी निवडणुकीची खलबते मात्र वाढली आहेत. मतदारांना आमिष देऊन आपल बाजुने वळविण्याचे प्रयत्न बुधवारी दिवसभर आणि रात्रभरही सुरू राहणार आहेत. मात्र यावेळी ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी वाढल्यामुळे उमेदवारांची अडचण होत आहे.
दरम्यान निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण करून मंगळवारी काही संवेदनशिल मतदान केंद्रांवरच्या कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणच्या बेस कॅम्पवर रवाना केले. उद्या ते कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर रवाना होतील. या निवडणुकीच्या कामात संपूर्ण मतदान संघात एकूण ८ हजार २५० कर्मचारी लागणार आहेत. विविध सुरक्षा दलांचा बंदोबस्त लावला आहे.
पथकांच्या वाहतुकीसाठी ५८ बसगाड्या
मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या पथकांची ने-आण करण्यासाठी निवडणूक विभागाने ५८ बसेस भाड्याने घेतल्या आहेत. यामध्ये गडचिरोली आगाराच्या ४२ तर अहेरी आगाराच्या १६ बसेसचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे व त्यांना परत आणण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. ९ एप्रिल ते जवळपास १२ एप्रिलपर्यंत बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाने ५६ रुपये प्रतीकिलोमीटर दराने बस उपलब्ध करून दिल्या आहेत.
केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागू
निवडणूक भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ९३५ मतदान केंद्रांचे १०० मिटरच्या परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात एकत्रित जमण्यासह विविध प्रकारची बंधने राहणार आहेत.
नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे- सिंह
मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.