Lok Sabha Election 2019; नक्षलग्रस्त भागातही मतदानाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:38 PM2019-03-29T13:38:43+5:302019-03-29T13:39:12+5:30
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजले जात आहेत. दुर्गम भागातील भामरागड तालुक्यात ताडगाव येथेसुद्धा बुधवारी रॅली काढून मतदान व आपली भूमिका यावर विस्तृत माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजले जात आहेत. दुर्गम भागातील भामरागड तालुक्यात ताडगाव येथेसुद्धा बुधवारी रॅली काढून मतदान व आपली भूमिका यावर विस्तृत माहिती देण्यात आली. वातावरण निर्मिती करून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली.
‘मतदान करून लोकशाही रूजवू या’, ‘आपली जबाबदारी, आपले अधिकार व प्रगत भारताचे स्वप्न करू या साकार’ आदी घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक या रॅलीत सहभागी झाले होते. तहसीलदार कैलास अंडिल व गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावने यांच्या मार्गदर्शनात रॅली काढण्यात आली.
रॅली यशस्वीतेसाठी ताडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक झाडे, सरोज मडावी, चांगदेव सोरते यांच्यासह इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
रांगोळीतून मतदान जागृतीचा संदेश
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, तसेच महिला मतदारांचा या प्रक्रियेत सहभाग वाढावा, या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धानोरा येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनी, शिक्षिका, पंचायत समितीचे कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. सदर रांगोळीतून मतदार जनजागृतीचे संदेश, मतदानाचे महत्त्व व स्त्री-पुरूष समानतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी बाळू निमसरकार, नायब तहसीलदार भैसारे तसेच सेतू केंद्रात येणारे विद्यार्थी व नागरिक हजर होते.