Lok Sabha Election 2019; पुढच्या निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत रेल्वेलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:01 AM2019-04-08T00:01:22+5:302019-04-08T00:02:20+5:30
वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग तयार होईल हा माझा शब्द आहे, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग तयार होईल हा माझा शब्द आहे, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिला.
येथील चंद्रपूर मार्गावर भाजपच्या जाहीर सभेत ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, भाजपचे उमेदवार खा.अशोक नेते, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ.कीर्तीकुमार भांगडिया, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव कोहळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार तथा मित्रपक्षाचे सुरेंद्र चंदेल उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ही निवडणूक ऐतिहासिक आहे. देशाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपलाच कौल द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्ह्याचे आमदार, खासदार जे प्रयत्न करायचे ते करतीलच, पण अर्थमंत्री म्हणून मी या जिल्ह्याच्या पाठीशी उभा आहे. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा प्रस्ताव खा.नेते यांच्या पुढाकाराने आल्यानंतर आम्ही तत्काळ राज्य सरकारचा ५० टक्के वाटा देण्यासाठी मंजुरी दिली. या रेल्वेलाईनच्या कामातील सर्व अडथळे दूर करून पुढील पाच वर्षात ही रेल्वेलाईन नक्की तयार होईल. अन्यथा पुढील वेळी मत देऊ नका, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या ५२ वर्षात केंद्रात आणि ४७ वर्षात राज्यातील काँग्रेस सरकारने या जिल्हावासियांना थातूरमातूर आश्वासनेच दिली. पण या जिल्ह्यात यापूर्वीच्या भाजप-सेनेच्या कार्यकाळात बीआरओ च्या माध्यमातून रस्ते तयार करण्याचे काम आम्हीच केले. आताही कोट्यवधी रुपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आम्हीच तयार करत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यातील बंगाली बांधव ३ पिढ्यांपासून ज्या जमिनीवर राबत त्यांना त्या जमिनीचे पट्टे देण्यासाटी किचकट कायद्यात सुधारणा करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. सिंचन वाढीसाठी चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. कोटगल प्रकल्पाला मान्यता दिली. विशेष योजना म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी मंजूर केल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान २०० वरून ५०० केले, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी ना.अम्ब्रिशराव आत्राम व इतर पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.
ओबीसी आरक्षण कमी करण्याचे पाप काँग्रेसचे
जिल्ह्यातील ओबीसी युवकांच्या नोकरीतील आरक्षण यापूर्वीच वाढणार होते, पण त्याला विरोध करण्याचे काम तत्कालीन आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केले. ९ जून २०१४ रोजी त्याबाबतचे परिपत्रक काढले होते, पण डॉ.उसेंडी यांनी ओबीसी आरक्षण वाढविण्याला विरोध करून पेसा लागू करा, असा आग्रह धरल्याचे अशोक नेते यांनी आपल्या भाषणात सांगितले. आम्ही २७ आॅगस्ट २०१८ रोजी ओबीसी आरक्षण वाढविणारा प्रस्ताव तयार केला. त्याला आदिवासी विभागानेही मान्यता दिली. आता राज्यपालांच्या मंजुरीसाठी तो थांबला आहे. आचारसंहिता उठल्यानंतर त्यावरील जीआर निघेल, असा विश्वास ख़ा.नेते यांनी व्यक्त केला.
अमित शहांचा दौरा रद्द
या जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार होते. परंतू यापूर्वीच्या दुसºया राज्यातील प्रचारसभेतून निघताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने ते पोहोचू शकले नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या अनेक नागरिकांचा हिरमोड झाला.