Lok Sabha Election 2019; चामोर्शी तालुक्याचा कौल कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:04 AM2019-03-31T00:04:43+5:302019-03-31T00:06:10+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
रत्नाकर बोमीडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. अहेरी व आरमोरी या दोन्ही विधानसभा मतदार संघाला जोडणारा तालुका असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर चामोर्शी तालुक्यातील मतदारांवर असतो.
निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोठी चढाओढ सुरू होती त्याचेही केंद्र चामोर्शी तालुक्यातच होते. अखेरीस काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात याच तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले डॉ.नामदेव उसेंडी यशस्वी झाले. त्यामुळे विद्यमान खासदार नेते आणि डॉ.उसेंडी अशी सरळ लढत असली तरी गेल्यावेळी याच दोघांच्या फाईमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेले डॉ.रमेशकुमार गजबे यांनी ५० हजारावर मते घेतली होती. यावेळी पुन्हा ते वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत.
दोन्ही प्रमुख पक्षातील गटबाजी केव्हा, कशी उफाळून येईल, हे सांगता येत नाही. भाजपाच्या प्रचारासाठी केंद्रातील वजनदार मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्टÑाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चामोर्शीत येत आहेत. त्यांच्या सभेनंतर भाजप-काँग्रेस उमेदवारांची स्थिती बऱ्यापैकी स्पष्ट होईल. परंतु मागील निवडणुकीत तिसºया स्थानी राहिलेले चिमूरचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांना रिंगणात उतरविणारे अॅड.प्रकाश आंबेडकर २ एप्रिल रोजी चामोर्शी येथे सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेनंतर निवडणुकीचा माहोल कसा बदलतो याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. वंचित व बहुजनांना सोबत घेण्यात ते यशस्वी झाले तर दुहेरी होत असलेली निवडणूक या तालुक्यात तरी तिहेरी झाल्याशिवाय राहणार नाही.
११ जि.प. क्षेत्र व एक नगर पंचायत असलेला चामोर्शी तालुका भाजपामय झाला असला तरी कार्यकर्त्यांच्या विभाजनामुळे पोखरला गेला आहे. त्याचा फायदा काँग्रेस कसा घेते यावरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये अंतस्त गटबाजी आहे, याची चुणूक न.पं. निवडणुकीत दिसून आली. तसेच उमेदवारी मिळवितानाही डॉ. नामदेव उसेंडींना त्रास गेलाच. दोन्ही पक्षातील गटबाजीचा लाभ घेऊन वंचित बहुजनांना एकत्रित करण्यात डॉ.गजबे यशस्वी झाले आणि अॅड. प्रकाश आंबेडकरांची जादूची झप्पी लागू पडली तर डॉ.गजबे देखील रणांगणात येऊन तिरंगी लढतीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस ते भाजप प्रवास
चामोर्शी तालुका पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राजकारणात शिवसेनेच्या प्रवेशानंतर शिवसेनेने आपला दबदबा निर्माण केला. नंतर अशोक नेते यांच्या राजकीय प्रवेशानंतर हा तालुका भाजपाच्या ताब्यात केव्हा व कसा गेला हे कोणालाच कळले नाही.