अडचणींवर मात करूनच मिळते अपेक्षित यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 09:52 PM2017-07-26T21:52:31+5:302017-07-26T21:53:59+5:30

एखादे हवे असलेले यश मिळविताना आपल्यासमोर असंख्य अडचणी असतात. पण अडचणींचा बाऊ करीत ध्येय सोडल्याने काहीही साध्य होणार नाही.

LOKMAT COMPETITION | अडचणींवर मात करूनच मिळते अपेक्षित यश

अडचणींवर मात करूनच मिळते अपेक्षित यश

googlenewsNext
ठळक मुद्देएसडीपीओ सागर कवडे : लोकमतच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिकेचे युवा वर्गाकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एखादे हवे असलेले यश मिळविताना आपल्यासमोर असंख्य अडचणी असतात. पण अडचणींचा बाऊ करीत ध्येय सोडल्याने काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी प्रत्येक अडचणींवर जिद्दीने मात करून यश मिळविता येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणाºया अनेक अडचणींना तोंड देऊन तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला यश निश्चितपणे मिळेल, असे मोलाचे मार्गदर्शन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना दिला.
‘लोकमत’च्या वतीने आयोजित ‘स्पर्धेच्या जगात’ या स्पर्धा परीक्षांवरील मार्गदर्शन मालिकेच्या जिल्हा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन करणाºया आकार अकादमीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अकादमीचे संचालक संतोष गोलीवार, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, मुख्य वितरक श्रीकांत पतरंगे, बालविकास मंचच्या संयोजिका किरण पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्यानंतर एसडिपीओ कवडे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवक-युवतींशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सांगितले. आपण कोणतेही क्षेत्र निवडा पण त्यात सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी योग्य नियोजन (प्लॅन) करा. ते नसेल तर अपयश पदरात पडल्याशिवाय राहात नाही. ‘शांततेच्या काळात जेवढा घाम गाळाल तेवढे युद्धात रक्त कमी सांडेल’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्यामुळे आज तुमचा शांततेचा काळ आहे त्यात मेहनत घेण्याची तयारी ठेवा, असे ते म्हणाले.
केवळ उपजिवीकेचे साधन म्हणून आणि अर्थार्जनासाठी नोकरीच्या मागे धावू नका. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी ज्या कामाचे समाधान वाटेल असे काम करा. नोकरी हे समाजसेवेचे माध्यम आहे. अधिकारी वर्गांनाही त्यांच्या कामात प्रचंड मेहनत करावी लागते, त्यादृष्टीने तयारी ठेवा. आज आपण काय आहे याचा विचार करण्यापेक्षा उद्या कुठे राहणार याचा विचार करा. कुंडीतील झाड कधीच मोठे होत नाही. त्यामुळे वटवृक्ष व्हायचे असेल तर वादळ, वारा, पावसाचा सामना करावा लागेल. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, एकाग्र चित्ताने ध्येय गाठा, असा सल्ला कवडे यांनी दिला.
दरम्यान कार्यक्रमानंतर युवक-युवतींनी लोकमतच्या या मालिकेचे अवलोकन करून ही मार्गदर्शनपर मालिका आमच्यासाठी निश्चित उपयोगी पडेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज ताजने यांनी तर आभार प्रदर्शन दिगांबर जवादे यांनी केले.

‘लोकमत’ची मालिका ठरेल फायदेशीर
राज्यातील अग्रगण्य दैनिक म्हणून लोकमतचे स्थान आहेच, पण विविध समाजोपयोगी उपक्रम लोकमत सातत्याने राबवित असते हे मी लहानपणापासून पाहात आहे, असे सांगून त्यांनी लोकमतच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक केले. आपल्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील कराडपासून लोकमतचा वाचक असल्याचे ते म्हणआले. स्पर्धेच्या जगात या मार्गदर्शनपर मालिकेचे मी सकाळीच अवलोकन केले आहे. ही मालिका विद्यार्थ्यांसाठी चांगली फायदेशिर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन
आपल्या मार्गदर्शनानंतर एसडीपीओ कवडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे देऊन कशा पद्धतीने तयारी करायची हे सांगितले. हे सांगताना त्यांनी स्वत:चे उदाहरणही दिले. बीएएमएसच्या अंतिम वर्षाला असताना स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची इच्छा जागृत झाली. हेच नियोजन आधी केले असते तर यापेक्षाही चांगले यश आपल्याला मिळविता आले असते. ती संधी तुम्हाला आहे. वेळीच स्वत:मधील क्षमता आणि आवड ओळखून नियोजन करा, असे ते म्हणाले.

सर्व महान व्यक्तींची अडचणीतूनच वाटचाल
देशात आणि जगात महान व्यक्तिमत्व म्हणून इतिहासात नाव नोंदल्या गेलेल्या अनेक व्यक्तींना जीवनात अनेक अडचणी आल्या. पण त्यांनी मागे न हटता त्यावर मात करीत प्रयत्न सुरू ठेवले. त्यामुळेच ते यशस्वी झाले. हे सांगताना त्यांनी अब्राहम लिंकन, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, बाजीप्रभू देशपांडे यांची उदाहरणे व त्यांच्या जीवनातील काही गोष्टीही सांगितल्या. त्यांनी तोंड दिलेल्या अडचणी पाहिल्यानंतर आपल्या अडचणी किती लहान आहे हे समजते, असे कवडे म्हणाले.

Web Title: LOKMAT COMPETITION

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.