भावी जोडीदार शोधताय, जन्मकुंडलीसह आरोग्यकुंडली पाहिली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:08 PM2024-11-07T15:08:45+5:302024-11-07T15:09:40+5:30
तज्ज्ञ म्हणतात, आरोग्य जपा: तुळशी विवाहापासून शोधमोहीम होणार सुरु
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लग्न जुळविताना जन्मकुंडली पाहिली जाते. सध्याच्या काळात आरोग्याची कुंडली पाहणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जन्मपत्रिकेवरून एकमेकांचे स्वभाव कळत असले, तरी निरोगी वैवाहिक जीवन जगण्यासाठी 'आरोग्य कुंडली' पाहणेही महत्त्वाचे ठरत आहे. आता तुळशी विवाहापासून भावी जोडीदार शोधण्याची मोहीम सुरु होते. दरम्यान अनेक कुटुंबीयांनी आपल्या मुलामुलींच्या जन्मकुंडली तयार करून ठेवल्या आहेत. जन्मकुंडली पाहून पत्रिका जुळविली जाते. मात्र वैवाहिक जीवन यशस्वी व निरोगी बनण्यासाठी आरोग्यकुंडली पाहणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
लग्न ठरवताना अनेकजण जन्मकुंडली पाहतात, तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना संकटाने आरोग्याबाबत नागरिकांना चांगलेच सतर्क केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आरोग्य कुंडली पाहणेही आवश्यक ठरणारे आहे. आरोग्याच्या दृष्टीने लग्नानंतर काही आरोग्याच्या समस्या उद्भवणार असतील किंवा आधीपासूनच असतील, तर त्यावर वेळीच उपाययोजना करता येणे सहज शक्य होते.
धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित तक्रारी या आहेतच; शिवाय ताणतणावाने आजच्या तरुण पिढीवर जणू कब्जाच केला आहे. त्यामुळे लग्नाआधी रीतसर तपासणी झाल्यास हे आजार समोर येतील आणि उपचार होतील, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींचे लग्न जुळविताना खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
आरोग्य कुंडलीत काय बघाल?
सिकलसेल स्क्रीनिंग: सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशीचा रोग आहे. हा रोग आनुवंशिक परंपरेचा आहे. शरीर दुबळे करणाऱ्या वेदना हे प्रमुख लक्षण असलेल्या या आजारामुळे न्यूमोनिया, रक्तप्रवाहातील संसर्ग, स्ट्रोक आणि तीव्र किंवा दुर्धर वेदना अशा गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार पुढील पिढीमध्ये संक्रमित होणे टाळायचे असेल तर स्क्रीनिंग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
"आरोग्य कुंडली बघितली तर अनुवंशिक किंवा इतर आजाराची वेळीच माहिती मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने आपण जोडीदार म्हणून योग्य आहोत की नाही हे लग्नाआधीच ठरवणे अनेकदा योग्य ठरते. निरोगी वैवाहिक आयुष्य जगायचे असल्यास हेल्थ चेकअपला पर्याय नाही. तपासणी झाल्यानंतर आजार, तक्रारही असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करता येतात."
- डॉ. प्रशांत आखाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली