नोकरी शोधताय, जरा सावधान... । डमी वेबसाइटद्वारे घातला जातोय गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:26 AM2021-07-15T04:26:06+5:302021-07-15T04:26:06+5:30
गडचिरोली : सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेरोजगारीचा भस्मासूर मोठा झाला आहे. याचाच गैरफायदा घेत नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाइन गंडा घालणाऱ्या ...
गडचिरोली : सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेरोजगारीचा भस्मासूर मोठा झाला आहे. याचाच गैरफायदा घेत नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात याला अद्याप कोणी बळी पडल्याची तक्रार आली नसली तरी अनेकजण या पद्धतीने फसगत होण्यापासून थोडक्यात बचावल्याचे प्रकार समोर येत आहेत. बेरोजगार युवक-युवती नोकरीच्या आशेने अनेक ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून नोकरीचा शोध घेत असतात. हे करताना एखादी जाहिरात त्यांना आकर्षित करते आणि तिथेच ते जाळ्यात फसतात. विविध कंपन्यांच्या नावांखाली खोट्या जाहिराती आणि खोट्या वेबसाइटसुद्धा बनवून बेरोजगारांना आकर्षित केले जाते. भरपूर पदे भरण्याचा देखावा त्यात करून अर्जांची नोंदणी किंवा परीक्षा शुल्काच्या नावाखाली विशिष्ट रक्कम दिलेल्या बँक खात्यात टाकण्यास सांगितले जाते; पण प्रत्यक्षात त्याचा कोणताच कॉल किंवा माहिती नंतर मिळत नाही आणि आपली फसगत झाल्याचे लक्षात येते.
अशी करा खातरजमा
- मेलवर नोकरी देणारे पत्र आले असल्यास तो मेल खात्रीशीर आहे का, याची तपासणी करा. स्पाम मेल असल्यास फसगत होत असल्याचे समजा.
- कोणत्याही सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना त्याचे परीक्षा शुल्क एखाद्याच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमा केले जात नाही.
- एखाद्या साइटवरून विशिष्ट खात्यात पैसे जमा करण्यास सांगितल्यास त्या बँकेच्या शाखेत जाऊन त्या खात्याची माहिती जाणून घ्यावी.
- संकेतस्थळावरून जास्तीत जास्त माहिती मिळवा
- अनोळखी लिंक्स किंवा संकेतस्थळावर जाण्याचे टाळा
- धोकादायक आणि फेक संकेतस्थळांना अँटीव्हायरसद्वारे ब्लॉक करा
अशी होऊ शकते फसवणूक
- नोकरीच्या आशेने अनेकजण रिक्त पदांची माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या साइटवर नोंदणी करतात. फसवणूक करणारे टोळके तेथून आपली माहिती मिळवून मोबाइलवर मॅसेज किंवा फोन कॉलमधून संपर्क करतात.
- बेवसाइटवर काही शोधत असताना मध्येच एखादी जाहिरात येते. त्यात महागड्या वस्तू कमी किमतीत मिळत असल्याचे आमिष दाखवून संबंधित लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. त्यातून फसवणूक होते.
अद्याप एकही प्रकरण नाही
- गडचिरोलीत अद्याप अशा फसवणुकीचे एकही प्रकरण दाखल झाले नसले तरी भविष्यात अशी प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
बेरोजगार युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. वेबसाइटवरील फ्लॅश जाहिराती किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. नोकरीसाठी पैशाची मागणी होत असल्यास खात्री करूनच पुढचे पाऊल उचलावे.
- गौरव गावंडे
पोलीस निरीक्षक, सायबर सेल