सेतू केंद्र चालकांकडून लूट

By admin | Published: May 23, 2017 12:38 AM2017-05-23T00:38:12+5:302017-05-23T00:38:12+5:30

तहसील कार्यालय स्तरावरील सेतूकेंद्र बंद करून खासगी व्यावसायिकांना सेतू केंद्र चालविण्याची परवानगी शासनाने दिले आहे.

Looted by Setu Center Driver | सेतू केंद्र चालकांकडून लूट

सेतू केंद्र चालकांकडून लूट

Next

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शासकीय दरापेक्षा चारपट रकमेची होत आहे वसुली
दिगांबर जवादे। लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तहसील कार्यालय स्तरावरील सेतूकेंद्र बंद करून खासगी व्यावसायिकांना सेतू केंद्र चालविण्याची परवानगी शासनाने दिले आहे. मात्र या सेतू केंद्र चालकांकडून नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा चार ते पाच पट किंमत आकारली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक या बद्दल अनभिज्ञ असल्याने सेतू केंद्र चालक सांगेल तेवढी किंमत देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दाखल्यांचे अर्ज तयार करण्याचे काम यापूर्वी तहसील स्तरावर असलेल्या सेतू केंद्रातून केले जात होते. सदर केंद्र तहसील कार्यालयाच्या परिसरातच राहत असल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यावर नियंत्रण राहत होते. त्यामुळे सेतू केंद्र चालक शासनाने ठरवून दिलेल्या दराऐवढेच पैसे घेत होते. यावर्षीपासून तहसील कार्यालयातील सेतू केंद्र बंद करून दाखल्यांसाठी आवश्यक असलेल्या केसेस तयार करण्याचे काम खासगी व्यावसायिकांना दिले आहेत. गडचिरोली शहरासह तालुक्यात ११ व्यावसायिकांना सेतू केंद्र चालविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार या खासगी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे आता या खासगी व्यावसायिकांकडे गर्दी दिसून येत आहे.
या सेतू केंद्रांच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, भारतीयत्व व वयाचे प्रमाणपत्र, वंशावळी, सर्वसाधारण प्रतिज्ञा पत्र, सातबारा, रहिवासी दाखला, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, अल्पभूधारक प्रमाणपत्र, नमूना -८ प्रपत्र आदी दाखल्यांसाठी लागणारे अर्ज तयार करून दिले जातात.
प्रत्येक दाखल्याचे अर्ज तयार करून देण्यासाठी किती रूपये आकारावे, याचे दर ठरवून दिले आहेत. आॅनलाईन निघणाऱ्या दाखल्यासोबतच दाखल्यासाठी किती रूपये दर आकारला जातो. याची पावती सुध्दा निघते. मात्र सेतू केंद्र चालक सदर पावती संबंधित नागरिकाला दाखवत नाही. परस्पर त्याच्याकडून १०० ते २०० रूपये मागितले जात आहेत. ग्रामीण भागातील निरिक्षर नागरिक याबाबत फारशी शहानिशा न करता सेतू केंद्र चालक मागेल तेवढे पैसे देऊन मोकळे होत आहेत. एक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखल्याचा अर्ज तयार करण्यासाठी शासकीय दर केवळ ३३ रूपये आहे. यासाठी सेतू केंद्र चालक १०० रूपये घेऊन लूट करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सेतू केंद्र चालकांमुळे अधिकारीही बदनाम
अर्जाच्या कागदपत्रांसोबतच संबंधित दाखल्यासाठी किती रूपये दर आकारला जातो, याची पावतीही निघते. मात्र चाणक्ष सेतू केंद्र चालक सदर पावती नागरिकांना दाखवित नाही. अर्जावर अर्जदाराच्या सह्या झाल्यानंतर सदर पावती अर्जाला जोडली जाते. त्यामुळे सेतू केंद्र चालक सांगेल तेवढे पैसे देऊन अनेक नागरिक मोकळे होतात. एखाद्या सुशिक्षीत नागरिकाने अधिकच्या दराबाबत विचारणा केल्यास दाखल्यावर सही करणाऱ्या अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात, असे सांगत आहेत. यामुळे महसूल विभागाचे अधिकारी सुध्दा बदनाम होत आहेत. एखाद्याने पैसे देण्यास नकार दिल्यास त्याला १५ दिवसानंतर येण्यास सांगितले जात आहे, हे विशेष.

नॉन क्रिमीलेअर नूतनीकरणासाठी घेतात १५० रूपये
तलाठ्याकडून दाखला आणून स्वत:च्या हाताने अर्ज लिहून सदर अर्ज जुन्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासह जोडल्यानंतर नॉन क्रिमीलेअर दाखला एसडीओ यांचेकडून नुतनीकरण करून मिळत होता. यासाठी रूपयाचाही खर्च येत नव्हता. आता मात्र हाच दाखला नुतनीकरण करण्यासाठी सेतू केंद्र चालक १५० ते २०० रूपये घेत आहेत. बेरोजगार विद्यार्थ्यांची सेतू केंद्र चालक लूट करीत आहेत.
दाखल्याचे दरपत्रक लावण्याचे सक्त आदेश असतानाही सेतू केंद्र चालक सदर आदेश पायदळी तुडवित असल्याचे दिसून येत आहे.

सेतू केंद्र चालकांची येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन त्यांना शासनाचे नियम समजावून सांगितले जातील. प्रत्येक सेतू केंद्र चालकाने त्याच्या केंद्रासमोर दरपत्रक लावणे आवश्यक आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधित केंद्राची तपासणी करून आपण कारवाई करू.
- डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी, गडचिरोली.

Web Title: Looted by Setu Center Driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.