कुलिंगच्या नावाने ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:00 AM2018-09-03T01:00:26+5:302018-09-03T01:01:37+5:30

शीतपेय, दूध, पाणी व इतर काही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवावे लागतात. या खर्चाच्या नावाने नियम तोडून सदर पदार्थ छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकले जात आहेत. लोकमतने शुक्रवारी स्टिंग आॅपरेशन केले. या स्टिंग आॅपरेशनदरम्यान सदर बाब उघडकीस आली आहे.

The looting of customers by the name of the cooling | कुलिंगच्या नावाने ग्राहकांची लूट

कुलिंगच्या नावाने ग्राहकांची लूट

googlenewsNext
ठळक मुद्देमाहीत असूनही तक्रार नाही : पाणी बॉटल, दूध व शीतपेयांची जादा किमतीत विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शीतपेय, दूध, पाणी व इतर काही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवावे लागतात. या खर्चाच्या नावाने नियम तोडून सदर पदार्थ छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकले जात आहेत. लोकमतने शुक्रवारी स्टिंग आॅपरेशन केले. या स्टिंग आॅपरेशनदरम्यान सदर बाब उघडकीस आली आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थ, पाणी बॉटल व शीतपेयांच्या बॉटल्स त्यावरील छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकल्या जात असल्याच्या तक्रारी लोकमतकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार लोकमतने शुक्रवारी गडचिरोली येथील गांधी चौकातील चार दुकानांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले. या स्टिंग आॅपरेशनदरम्यान काही वस्तुंची विक्री त्यावरील छापील किमतीपेक्षा अधिक दराने केली जात असल्याचे दिसून आले.
२०० एमएल शीतपेयाच्या बॉटलवर १५ रूपये किंमत छापली होती. या बॉटलची किंमत दुकानदाराने २० रूपये सांगितली. ६०० एमएलच्या बॉटलवर ३५ रूपये किंमत छापली होती. सदर बॉटलची किंमत ४० रूपये सांगितले. पाण्याच्या काही बॉटलवर १८ तर काही बॉटलवर १९ रूपये किंमत छापली होती. या बॉटल सरसकट २० रूपयांना विकल्या जात होत्या. दूध पॉकिट व इतर दुग्धजन्य पदार्थांबाबतही असाच अनुभव आला. २०० एमएलच्या दूध पॉकेटवर १० रूपये किंमत लिहिली होती. तो दूध पॉकेट दुकानदाराने ग्राहकाला ११ रूपयाला विकला. ५०० एमएलच्या दूध पॉकेटवर २१ रूपये किंमत छापली होती. तो दूध पॉकेट २२ रूपयांला विकतो, असे दुकानदाराने सांगितले. एकंदरीतच पाणी, शीतपेय, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री त्यावर छापलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने होत असल्याचे दिसून आले.
स्टिंग आॅपरेशनदरम्यान आलेला अनुभव हा प्रातिनिधीक स्वरूपाचा आहे. जिल्ह्यात इतरही शहरांमध्ये या वस्तू छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकल्या जातात, अशी माहिती प्राप्त झाली. विक्रीमध्ये एक ते दोन रूपयांचा फरकही दिसून आला. छापील किमतीपेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. ही बाब दुकानदारांना माहिती आहे. मात्र वस्तुंच्या किमतीवर नियंत्रण ठेवणारा विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याने दुकानदार बिनधास्त असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत होते. अधिकाऱ्यांनीही कारवाई करण्याची गरज आहे.

ग्राहकच साधतात चुप्पी
छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. याची माहिती बहुतांश ग्राहकांना आहे. मात्र याबाबत जाब विचारण्याची हिंमत ग्राहक करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुकानदार म्हणेल तेवढी किंमत देऊन ग्राहक मोकळे होतात. ग्राहकांच्या या चुप्पीचा लाभ दुकानदार घेत आहेत. छापील किमतीच्या खाली सर्व करांसहित असा उल्लेख केलेला असतो. याचा अर्थ संंबंधित वस्तूच्या छापील किमतीत ठोक, किरकोळ व्यापारी यांचा नफा, वाहतूक खर्च व इतर कर जोडलेले असतात. त्यामुळे छापील किमतीपेक्षा वस्तुची विक्री करण्याची गरज नाही. मात्र खुलेआम अधिक दराने विक्री केली जात आहे.

दूध, दुग्धजन्य पदार्थ, शीतपेय, पाणी या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्याशिवाय पर्याय नाही. दुकानदारांना महावितरण व्यावसायिक दराने वीज पुरवठा करते. रात्रंदिवस फ्रिज सुरू राहत असल्याने हजारो रूपये वीज बिल येते. शीतपेयांच्या कंपन्या अत्यंत कमी मार्जिन दुकानदाराला देतात. १५ रूपयांच्या बॉटलवर १ ते २ रूपये मिळतात. तेवढा खर्च विजेवरच होतो. दुकानदाराचा नफा गेला कुठे? त्यामुळे शीतपेय अधिक किमतीने विकावे लागतात. दूधही फ्रिजमध्येच ठेवावे लागते. कधीकधी दूध खराब झाल्यास त्याचा तोटा दुकानदारालाच सहन करावा लागतो. १० रूपयांच्या दुधाच्या पॉकेटवरही केवळ १ रूपया मिळतो. एक दूध पॉकेट खराब झाल्यास १० दूध पॉकेटांवरील नफा जातो. पाण्याच्या बॉटलवरही १ ते २ रूपये मिळतात. त्यामुळे या सर्व वस्तू छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकल्याशिवाय पर्याय नाही. छापील किमतीत वस्तू विकायच्या असतील तर शासनाने संबंधित कंपन्यांना निर्देश देऊन अधिक मार्जिन दुकानदारांना उपलब्ध करून द्यावी. बºयाचवेळा चिल्लरच्या टंचाईमुळेही सरसकट २० ते ३० रूपयांना वस्तू विकावी लागते.
- दुकानदार डेली नीड्स, इंदिरा गांधी चौक

छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने वस्तू विकणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र दुकानदार काही वस्तू अधिक किमतीने विकतात. कायद्याचा धाक राहिलेला नाही. किमतीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्या विभागावर आहे. त्या विभागाचे अधिकारीसुद्धा दुर्लक्ष करतात. एकटा ग्राहक घराजवळच्या दुकानदारासोबत भांडण्याची हिंमत ठेवत नाही. त्यामुळे अधिकाºयांनीच कारवाई करणे गरजेचे आहे.
- इंद्रपाल मडावी, इंदिरानगर वॉर्ड
गडचिरोली

Web Title: The looting of customers by the name of the cooling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.