रस्ते विकासाच्या नावावर केंद्र सरकारकडून जनतेची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:23+5:302021-06-09T04:45:23+5:30
गडचिरोली : केंद्र सरकार पेट्रोलच्या प्रत्येक लिटरमागे रस्ते विकासाच्या नावावर १८ रुपये अतिरिक्त आकारत आहे. म्हणजे लोकांच्याच पैशातून रस्ते ...
गडचिरोली : केंद्र सरकार पेट्रोलच्या प्रत्येक लिटरमागे रस्ते विकासाच्या नावावर १८ रुपये अतिरिक्त आकारत आहे. म्हणजे लोकांच्याच पैशातून रस्ते तयार केल्यानंतरही त्याच रस्त्यांना पुन्हा टोल टॅक्स लावून लोकांची लूटमार करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना केला. केंद्राने पेट्रोल-डिझेलसह गॅसची दरवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष पटोले आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ७) इंधन-गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसच्या वतीने देसाईगंज, आरमोरी आणि गडचिरोली येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यानंतर गडचिरोलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटोले म्हणाले, अटबिहारी वाजपेयी पंतप्रधान असल्यापासून पेट्रोलवर लिटरमागे १ रुपया रस्ते विकास कर घेतला जात होता. नंतर काँग्रेस सरकारच्या काळातही १ रुपया कर कायम होता. त्यातून वर्षाला १९ हजार कोटी रुपये जमा होत होते. आता १ रुपयाऐवजी १९ रुपये घेऊन अब्जावधी रुपये लोकांच्या खिशातून काढले जात आहेत. सध्या जे रस्ते तयार केले जात आहेत, त्याचे इस्टिमेट आपल्या मर्जीनुसार खासगी यंत्रणेकडून बनवून घेऊन त्याचे कंत्राट आपल्याच बगलबच्च्यांना दिले जातात. त्याच रस्त्यांना पुन्हा टोल लावून लोकांना लुटले जाते, असे पटोले म्हणाले. केंद्र सरकारने हे रस्ते ६ लाख कोटींत विदेशी कंपन्यांना विकण्याची व्यवस्था केल्याचा आरोप यावेळी पटोले यांनी केला.
देशात कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे. अशात पेट्रोल-गॅसवरील अतिरिक्त भुर्दंड कमी करून दर कमी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसच्या या आंदोलनात आ. अभिजित वंजारी, चंद्रकांत हांडोरे, रवींद्र दरेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश प्रतिनिधी विश्वजित कोवासे, डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
(बॉक्स)
धान भरडाई न होण्यासाठी केंद्रच जबाबदार
गडचिरोली जिल्ह्यात सध्या १० लाख क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. केंद्र सरकारने पाठविलेली समिती तो धान खाण्यायोग्य नाही असा अहवाल देऊन लॉट रिजेक्ट करीत आहे. त्यामुळे भरडाई करण्यास मिलर्स उत्सुक नाहीत. धानाची भरडाई न होण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
(बॉक्स)
लोहप्रकल्पाबाबत भूमिकेत बदल नाही
गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेला प्रस्तावित लोहप्रकल्प या जिल्ह्यातच व्हावा ही आमची आधीपासूनची भूमिका आहे. त्यातच या जिल्ह्यातील नागरिकांचे हित आहे. त्याबाबतच्या भूमिकेत बदल झाला नाही, असे सांगत जिल्ह्याबाहेरील लोहप्रकल्पासाठी या जिल्ह्यातील लोहदगड वापरण्यास आपला विरोध कायम असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.
===Photopath===
070621\07gad_1_07062021_30.jpg
===Caption===
07gdph21.jpgगडचिरोलीतील एका पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना.विजय वडेट्टीवार व इतर पदाधिकारी.