वनकर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो ; वनतस्करी वाढली
By admin | Published: March 28, 2017 12:39 AM2017-03-28T00:39:42+5:302017-03-28T00:39:42+5:30
वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
कारवाईची मागणी : बहुतांश कर्मचारी गडचिरोली, मूलवरून करतात ये-जा
मुरूमगाव : वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र येथील बहुतांश वनकर्मचारी निवासस्थानी न राहता मूल, गडचिरोली, धानोरा, चंद्रपूर, आरमोरी, कुरखेडा यासारख्या शहराच्या ठिकाणावरून ये-जा करतात. जंगलाची तस्करी रात्रीच होते. मात्र कर्मचारी मुख्यालयी व कर्तव्यावर राहत नसल्याची बाब तस्करांना चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याने वनतस्करीचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
मुरूमगाव परिसरातील बहुतांश गावे जंगलांनी वेढले आहेत. येथील एकूण वन जमिनीच्या सुमारे ९० टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. त्यामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्र कार्यालय दोन विभागात विभागण्यात आले आहे. मुरूमगाव पूर्व व पश्चिम असे दोन रेंज आहेत. जंगलाच्या संरक्षणासाठी शेकडो वनकर्मचारी व वनाधिकारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजाविता यावे, यासाठी सुस्थितीतील निवासस्थाने बांधून दिली आहेत. मात्र या ठिकाणी काही निवडक वनकर्मचारी राहतात.
इतर वनकर्मचारी दुसऱ्या गावावरून ये-जा करतात. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे सक्तीचे असले तरी मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश वनकर्मचारी हा नियम धाब्यावर बसवित ये-जा करीत आहेत. मुरूमगाव ते गडचिरोलीचे अंतर जवळपास ६० किमी आहे. गडचिरोलीवरून मूल ५० किमी, आरमोरी ३० किमी अंतरावर आहे. म्हणजेच वन विभागाचे कर्मचारी जवळपास १०० किमी अंतरावरून ये-जा करतात. दुपारी १२ ते १ वाजता कर्तव्यावर पोहोचतात व दुपारी ३ ते ४ वाजताच जाण्याची तयारी सुरू करतात. सुट्या लागून आल्यानंतर एक दिवस अगोदर व नंतर ते आपल्या कर्तव्यावर येत नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे मुरूमगाव परिसरात मागील काही दिवसांपासून खुलेआम लाकडांची तस्करी केली जात आहे. मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
वनव्यावर नियंत्रण राहणार कसे?
वनव्यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. उन्हाळ्यामध्ये वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. वनवा लागल्यानंतर नागरिक याबाबतची माहिती संबंधित वनरक्षक किंवा वनपालाला देतात. दरवेळी सदर वनरक्षक किंवा वनपाल मुख्यालय सोडून गडचिरोली किंवा मूलमध्ये आहे, असे सांगतो. त्यावेळी नागरिकही हतबल होतात. वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्रात दरवर्षी आगी लागण्याचे प्रमाण इतर वनपरिक्षेत्रांच्या तुलनेत वाढले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.