वणव्याने बोरी जंगलाची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 01:44 AM2016-03-12T01:44:42+5:302016-03-12T01:44:42+5:30
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली.
लगामचे कार्यालय कुलूपबंद : लाखोंची वनसंपदा जळून खाक
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यामुळे जंगलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र लगाम येथील वनपाल कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. वन विभागाच्या या बेजबाबदार कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गुरूवारी सकाळीच बोरी परिसरातील जंगलाला आग लागली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने जंगलाला वणवा लागला असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. वणव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने वणवा वाढतच चालला होता. दरम्यान, वन्यप्रेमी संघटनेचे प्रमुख रामू मादेशी, वैशाली वाढणकर, माजी सरपंच लालू करपेत हे वणव्याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष लगाम येथील वनपाल कार्यालयात गेले असता, कार्यालयाला कुलूप लावून असल्याचे आढळून आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, कार्यालय बंद असल्याचे नेमके कारण सांगल्यास असमर्थतता दर्शविली. वणव्याची माहिती आलापल्लीचे उपवनसंरक्षक एच. के. मीना यांनाही वॉटस्अॅपवरून देण्यात आली.
बोरी जंगलात सागवानाची वृक्ष आहेत. या आगीमध्ये अनेक लहान रोपटे जळून खाक झाली. त्याचबरोबर पावसाळ्यात उन्मळून पडलेले वृक्ष सुद्धा या आगीमध्ये जळाले. परिणामी वन विभागाचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने जंगलाला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडणार आहेत. मात्र या आगीला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाने सतर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे आग कुठे लागली याची माहिती वन विभागाला वेळीच मिळत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे, आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
जंगलात नियमित गस्त आवश्यक
पुढील महिन्यात मोहफुलाचा हंगाम सुरू होत आहे. मोहफूल विकण्यासाठी जागा साफ करण्यासाठी अनेक नागरिक मोहफुलाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. त्याचबरोबर तेंदूपत्त्याच्या हंगामादरम्यानही जंगलांना आगी लावण्याच्या घटना नियमितपणे घडतात. त्यामुळे वन विभागाने आता विशेष सतर्क राहून जंगलात नियमितपणे गस्त घालणे आवश्यक आहे. प्रत्येक गावातील नागरिकाला वनपाल किंवा वनरक्षकाने स्वत:चा दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवल्यास नागरिक याबद्दलची माहिती संबंधित वन कर्मचाऱ्याला देतील. वन विभागाच्या सहकार्याने सदर आग वेळीच आटोक्यात आणणे या उपायांमुळे शक्य होणार आहे.