बँकेत मजुरी जमा करण्यास खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:34 PM2019-06-10T21:34:01+5:302019-06-10T21:34:21+5:30
तेंदूपत्ता संकलनाची मजुरी रोखीने न देता संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मागील वर्षीच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार तसेच ग्रामसभांना दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानताच याही वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी रोखीने देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाची मजुरी रोखीने न देता संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मागील वर्षीच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार तसेच ग्रामसभांना दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानताच याही वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी रोखीने देण्यात आली आहे.
तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले असले तरी बहुतांश ग्रामसभा स्वत: तेंदूपत्ता संकलन न करता कंत्राटदाराला तेंदूपत्ता संकलनाचे अधिकारी देतात. कंत्राटदार ग्रामसभेला प्रती स्टॅन्डर्ड बॅग रॉयल्टी देते. तेंदूपत्ता व्यवसायातून पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराने मजुरांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. विविध योजनांसाठी दुर्गम व ग्रामीण भागातीलही नागरिकांचे बँक खाते उघडले आहेत. त्यामुळे बँक खात्यात मजुरी जमा करण्यास काहीच अडचण नाही. मात्र मजुरांचे बँक खाते नसल्यसाचे कारण पुढे करून कंत्राटदारांनी या वर्षीही मजुरांना रोखीने मजुरी दिली आहे. रोखीने मजुरी देताना ग्रामसभेने हस्तक्षेप करणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदारांनी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन त्यांचे तोंड बंद केले. तेंदूपत्ता व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी तेंदूपत्त्याचे संंपूर्ण व्यवहार बँकेच्या मदतीने होणे गरजेचे आहे, अशी मागणी काही ग्रामसभांच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे.
मजुरांना देण्यासाठी रोख रक्कम नेतांना याबाबतची पूर्वसूचना पोलिसांना देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी कंत्राटदारांना दिल्या आहेत. मात्र पोलिसांनाही सूचना देण्यात आली नाही.
काळा पैसा गुंतला तेंदूपत्त्यात
काही कंत्राटदार काळा पैसा तेंदूपत्ता व्यवसायात गुंतवतात. तसेच नक्षल्यांनाही तेंदूपत्ता कंत्राटदार मदत करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी बँक खात्यातच मजुरी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे यावर्षीही काळा पैसा तेंदूपत्ता व्यवसायात पांढरा करण्यात आल्याची शक्यता आहे.