दम्याच्या औषधीसाठी कोकडीत लोटला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:01 AM2018-06-09T00:01:58+5:302018-06-09T00:01:58+5:30
देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : देसाईगंज तालुकास्थळापासून सात किमी अंतरावर असलेल्या कोकडी येथे मृगनक्षत्राचे पर्वावर दम्याची औषधी घेण्यासाठी देशभरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक आले होते. औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत ही रांग कायम होती. वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मार्गदर्शनात औषधी देण्यात आली.
प्रल्हाद कावळे यांचा सेवाभावी उपक्रम मागील ३८ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मृगनक्षत्राच्या पर्वावर शुक्रवारी १२.३० वाजेपासून मासोळीतून दमा रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यास सुरुवात झाली. यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडत हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. संपूर्ण कोकडी गाव नागरिक व वाहनांच्या गर्दीने फुलून गेला होता. देसाईगंजपासून कोकडीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आ.कृष्णा गजबे यांनी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. तसेच पाणपोईची व्यवस्था केली. देसाईगंज पंचायत समिती व ग्रामसेवकांच्या वतीने मंडप, मॅट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. नगर परिषद देसाईगंज, तिरूपती विद्यालय कोकडी, कृषी सहायक सुधाकर कोहळे यांनी पाणपोई उभारली. ग्रामीण रुग्णालय देसाईगंज व प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूडच्या वतीने आरोग्यसेवा पुरविण्यात आली. औषधीसाठी लागणारी मासोळी कोकडी येथील भोई बांधवांनी उपलब्ध करून दिली. औषधी वाटपासाठी कोकडी येथील ग्राम सुरक्षा दल सदस्य, युवकवर्ग, शिक्षक, कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. गर्दीचा प्रचंड त्रास कोकडीवासीयांना सहन करावा लागत असला तरी सेवाभावाची भावना येथील नागरिकांच्या मनात अजूनही कायम असल्याने या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे आदरातिथ्य केले जाते, हे विशेष.
उद्घाटनीय कार्यक्रमाला माजी खा. नाना पटोले, आ. कृष्णा गजबे, माजी आ. आनंदराव गेडाम, देसाईगंज पं.स. चे सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, जि.प. सदस्य रोशनी पारधी, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अॅड. संजय गुरू, १९१ सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, माजी सभापती पसराम टिकले, नाना कांबळे, भूषण खंडाते, सरपंच सुधीर वाढई, उपसपंच वीरघरे, पोलीस पाटील पुरूषोत्तम कापगते, तंमुस अंध्यक्ष रामू सहारे, माजी सरपंच मंसाराम बुद्धे आदी उपस्थित होते.
कोकडीसाठी सोयी द्या
गेल्या ३८ वर्षांपासून कोकडीत दमाग्रस्तांना औषधी देण्याची निस्वार्थ सेवा प्रल्हाद कावळे व गावकरी करीत आहेत. या कार्यात परिसरातील अनेक मच्छीमार बांधव अहोरात्र सेवा देतात. पण शासन इतर संस्थांना ५-५ कोटी देत असताना या मानवतेच्या कार्यासाठी शासन कोणत्याही सोयी करीत नाही, अशी खंत माजी खा.नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.