कमी भारमानाच्या एसटी बसफेऱ्या होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:44 PM2020-01-09T19:44:08+5:302020-01-09T19:44:33+5:30
महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे.
गडचिरोली : एसटी महामंडळाचा वाढणारा तोटा कमी करण्यासाठी आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ज्या मार्गावरील बसफेरीचे भारमान (प्रवाशी संख्या) ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशा मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने आगारांना दिले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद होऊन खासगी वाहनधारकांची मनमानी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राची लोकवाहिनी अशी ओळख निर्माण केलेल्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक झाली आहे. एसटीचा एकूण तोटा सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. काही विभागीय कार्यालयांकडे बसमध्ये डिझेल भरण्यासाठीसुध्दा पैसे शिल्लक राहात नाही, अशी बिकट स्थितती निर्माण झाली आहे. तोटा वाढत गेल्यास एसटी महामंडळ चालविणे कठीण होणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चालविल्या जातात. मात्र या बसला अत्यंत कमी प्रवाशी मिळत असल्याने बसफेरीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे ज्या बसफेरीचे भारमान ३० टक्केपेक्षा कमी आहे, अशी बसफेरी तत्काळ बंद करून त्याऐवजी ज्या मार्गावर अधिक प्रवाशी मिळू शकतात, अशा मार्गावर बसफेरी सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यभरातील सर्व आगारांना दिले आहेत. ३० टक्केपेक्षा कमी भारमान असलेल्या किती बसफेऱ्या आहेत याची माहितीसुध्दा मागितली आहे. लवकरच या बसफेऱ्या बंद होणार आहेत.
छोट्या गाड्या बंद केल्याने तोट्यात भर
एसटीची खरी गरज ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. परंतू महामंडळाच्या मोठ्या आकाराच्या बसेससाठी पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ज्या मार्गावर प्रवाशी कमी असतात, अशा मार्गावर मध्यम आकाराच्या चालक-वाहक एकच असलेल्या बसफेऱ्या सुरू केल्यास ते एसटी महामंडळासाठी फायद्याचे ठरू शकते. १० वर्षापूर्वी ‘यशवंती’नावाने छोट्या गाड्या महामंडळाने सुरू केल्या होत्या. पण आज त्यापैकी एकही बस महामंडळात नाही. त्या छोट्या बसेस का गायब करण्यात आल्या याचे कारण गुलदस्त्यात आहे.
‘गाव तिथे एसटी’या ब्रिदाला तडा
एसटी महामंडळाने ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रिदवाक्य घेऊन व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून बसगाड्यांची सोय करत गावोगावी बसफेरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता नवीन निर्णयामुळे अनेक फेऱ्या बंद होऊन महामंडळाच्या ब्रिदवाक्यालाच तडा जाणार आहे. यामुळे ग्रामीण नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागात एसटी बस नाही त्या मार्गावर खासगी वाहने भरभरून जातात. असे असताना महामंडळाकडून छोट्या गाड्यांचा वापर करणे सोडून बसफेरीच बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या संतापाला उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकतो.