सवलतीवर अत्यल्प बियाणे
By admin | Published: June 1, 2017 01:46 AM2017-06-01T01:46:59+5:302017-06-01T01:46:59+5:30
जिल्हा परिषदेच्या १३ वने ७ टक्के वनमहसूल अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात
जि. प. च्या कृषी विभागाकडे अल्प तरतूद : केवळ १ हजार १६८ क्विंटल बियाणे मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या १३ वने ७ टक्के वनमहसूल अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अनुदानावर बियाणे वाटपासाठी केवळ १९.९५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली. या तरतुदीतून केवळ १ हजार १६८ क्विंटल धान बियाणे शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीवर उपलब्ध होणार आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता अनेक शेतकरी सवलतीच्या धान बियाणांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जि. प. च्या १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदान योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर बियाणे वाटपाची योजना कृषी विभागामार्फत राबविली जाते. गतवर्षीही या योजनेअंतर्गत ५० टक्के सवलतीवर धान बियाणांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी जिल्ह्याच्या १२ तालुक्यात धान बियाणांची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र जि. प. च्या कृषी विभागासाठी अत्यल्प तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीवर धान बियाणे उपलब्ध होणार नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेती व्यवसायावरच गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने अनेक बेरोजगार तरूणही शेती व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र प्रशासनाच्या वतीने पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सवलती दिल्या जात नाही.
एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील तसेच सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरीप हंगामात जि. प. च्या कृषी विभागामार्फत ५० टक्के सवलतीवर धान बियाणे उपलब्ध करून दिली जातात. मात्र जि. प. प्रशासनाने यावर्षी सवलतीच्या बियाणे वाटपाच्या योजनेत निधीला कात्री लावल्यामुळे अनेक शेतकरी सवलतीच्या बियाणांपासून वंचित राहणार आहेत. परिणामी ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्याकडील बियाणे नाहीत, अशा शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून बाजारभावानुसार धान बियाणे खरेदी करावे लागणार आहे. प्रसंगी धावपळही करावी लागते.
सिरोंचा तालुक्याला सर्वात कमी बियाणे
५० टक्के सवलतीवर धान बियाणे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. यानुसार १ लाख १२ हजार रूपये किंमतीतून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ ६५ क्विंटल धान बियाणे पुरविली जाणार आहे. यामध्ये श्रीराम २० क्विंटल, एमटीयू १०१० बियाणे ३० क्विंटल व पीकेव्ही/एचएमटी हे धान बियाणे केवळ १५ क्विंटल सवलतीच्या दरात पुरविण्यात येणार आहे. सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या मानाने सवलतीवर पुरविण्यात येणारी ही धान बियाणे अत्यल्प आहेत.
कृषी केंद्रातून उपलब्ध होणार बियाणे
जि. प. कृषी विभागाच्या वतीने पं. स. स्तरावर नियोजन पाठवून ग्रामीण भागातील कृषी केंद्रात ५० टक्के सवलतीवर वाटप करण्याचे धान बियाणे यंदाच्या खरीप हंगामात पोहोचविण्यात येणार आहे. श्रीराम धान बियाणांचा प्रतिक्विंटल दर २ हजार ३०० रूपये आहे. एमटीयू १०१० या वाणाच्या धान बियाणाचा प्रतिक्विंटल दर १ हजार ४०० रूपये तर जेजीएल १७९८ वाणाचा प्रतिक्विंटल दर १ हजार ४५० रूपये आहे. पीके व्ही/एचएमटी धान बियाणांचा दर १ हजार ६०० रूपये आहे. या दरानुसार ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे.
कृषीसाठी अधिक तरतूद हवी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता त्यांना सवलतीच्या दरात धान व इतर बियाणे पुरविण्यासाठी जि. प. च्या कृषी विभागाला अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. यादृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.