जीवाभावांची माणसं हीच सावकारांची तिजोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:00 AM2018-01-07T01:00:36+5:302018-01-07T01:00:49+5:30
गडचिरोली हा मागास जिल्हा असतानाही अरविंद पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस येऊ दिली नाही. बँकांकडे प्रचंड मनुष्यबळ असते. परंतु नेतृत्व चौफेर असावं लागतं. वेगळा स्वभाव असल्याशिवाय माणसं हाताळता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली हा मागास जिल्हा असतानाही अरविंद पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस येऊ दिली नाही. बँकांकडे प्रचंड मनुष्यबळ असते. परंतु नेतृत्व चौफेर असावं लागतं. वेगळा स्वभाव असल्याशिवाय माणसं हाताळता येत नाही. अरविंद पोरेड्डीवार यांच्यात हे कौशल्य असून, आयुष्यात जीवाभावांची माणसे पोरेड्डीवार यांनी मिळविली. जीवाभावांची माणसं हीच सावकारांची तिजोरी आहे, असे गौरवोद्गार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांनी काढले.
गोंडवाना कला दालनात गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेचा ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार सहकारमहर्षी अरविंद पोरेड्डीवार यांना कुलगुरु डॉ.कल्याणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अरविंद खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे उपस्थित होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती अरविंद सा. पोरेड्डीवार, एंजल देवकुले, प्रेस क्लबचे सचिव प्रा.अनिल धामोडे, उपस्थित होते.
कुलगुरु डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले, जिल्हा सहकारी बँका या राजकारणाचा अड्डा बनल्याची टीका करण्यात येते. परंतू अरविंद पोरेड्डीवार यांनी राजकारणासोबतच समाजकारण व अन्य क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. अरविंद खोब्रागडे यांनी आपल्या मनोगतात अरविंद पोरेड्डीवार यांनी पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काराची उंची वाढल्याचे सांगितले.
याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावून सिकाई मार्शल आर्ट प्रकारात ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वर्ल्ड किंगचा किताब मिळविणाºया एंजल विजय देवकुले हिला पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रेस क्लबचे सदस्य विलास दशमुखे हे पंचायत समितीचे उपसभापती झाल्याबद्दल त्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल धामोडे, संचालन महेश तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन मनोज ताजने यांनी केले. कार्यक्रमाला आ.कृष्णा गजबे, प्राचार्य डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, भाग्यवान खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरड्डीवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शशिकांत साळवे, अनंत साळवे, श्रीहरी भंडारीवार, महेश काबरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सदस्य सुरेश पद्मशाली रोहिदास राऊत, सुरेश सरोदे, शेमदेव चापले, सुरेश नगराळे, नंदकिशोर काथवटे, मारोतराव मेश्राम, विलास दशमुखे, जयंत निमगडे, रूपराज वाकोडे, निलेश पटले आदींनी सहकार्य केले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सभागृह भरगच्च भरला होता.