तेंदू कंत्राटदारांची ग्रामसभांकडे लॉबिंग सुरू
By admin | Published: March 17, 2017 01:21 AM2017-03-17T01:21:57+5:302017-03-17T01:21:57+5:30
पेरमिली वनपरिक्षेत्रात सहा ग्रामपंचायती असून सर्वच ग्राम पंचायती पेसा अंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार
पेरमिली परिसर : २०१५-१६ चा बोनस अजूनही मिळाला नाही
पेरमिली : पेरमिली वनपरिक्षेत्रात सहा ग्रामपंचायती असून सर्वच ग्राम पंचायती पेसा अंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार मिळालेल्या आहेत. सहाही ग्रामपंचायतीत तेंदूपत्ता युनिट लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच व ग्रामसभा सदस्य, पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांना प्रलोभन देऊन तेंदू कंत्राटदार लॉबिंग करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
तेंदू संकलन पारदर्शकपणे झाले पाहिजे, असे वन विभागाचे निर्देश आहे. त्याकरिता प्रशासनाने नियमावलीही तयार केली आहे. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १०० टक्के नागरिकांची उपस्थिती राहत नाही. मोजकेच नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे कोणताही ठराव पारीत न करता लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी अडचण निर्माण होते व संबंधित समितीचे त्यानंतर निर्णय घेऊन हे काम मार्गी लावत असते.
अहेरी विभागासह गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात तेंदूपत्ता हंगाम हाच ग्रामीण लोकांचा मुख्य रोजगार आहे. वर्षभराची मिळकत त्यांना यातून उपलब्ध होते. मात्र या तेंदूपत्त्याची लिलाव प्रक्रिया सध्या ग्रामसभांच्या अखत्यारित असल्याने तेंदू कंत्राटदार ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी यांना मॅनेज करून स्वत:चा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अनेकवेळा तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनसपासून वंचित राहावे लागते. पेरमिली परिसरात वर्ष २०१५-१६ चा बोनस अजूनही वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे तेंदू संकलनाचे काम करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे यंदातरी तेंदू संकलनाचे काम पारदर्शकपणे व्हावे, अशी मागणी आहे.