मशीनरीज आल्या, मात्र तज्ज्ञ नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:19 AM2018-05-19T01:19:44+5:302018-05-19T01:19:44+5:30
महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून आरमोरी येथे लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज इमारत बांधली. पाळीव जनावरावरील विविध आजाराचे निदान व्हावे, यासाठी गुराच्या तपासणीकरिता महागड्या मशिनरी येथे पुरविण्यात आल्या. मात्र आधीच रिक्त पदाने जर्जर असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा डोलारा एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर आहे. सदर प्रशस्त इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. महागड्या मशीन येथे पोहोचल्या असल्या तरी या मशीन हाताळण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली नाही. या सर्व समस्यांमुळे पशुवैद्यकीय सेवा अस्थिपंजर झाली असून पशुचिकित्सालयाच्या नव्या इमारतीचा कारभार ओस पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आरमोरी येथे १ कोटी ९२ लाख रूपये खर्च करून शासनाच्या वतीने तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची मोठी सुसज्ज इमारत दोन वर्षापूर्वीच बांधण्यात आली. येथे गुरांच्या विविध आजारांचे निदान व्हावे, यासाठी एक्स-रे मशीन, सोनोग्राफी व विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी नवीन मशीनरीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र सदर मशीनरी हाताळण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे तज्ज्ञांअभावी मशीनरीज सेंटरचा काय उपयोग, गुरांच्या आजारांचे निदान कसे कळणार, असा प्रश्न पशुपालकांनी उपस्थित केला आहे. मात्र या गंभीर समस्येकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.
सहायक आयुक्तांचे पद रिक्त
तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात एकूण पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पशुवैद्यकीय अधिकारी व २० दिवसांपूर्वी नियुक्त झालेला परिचर या दोघांच्या भरवशावर या चिकित्सालयाचा कारभार सुरू आहे. येथील मुख्य पद असलेले सहायक आयुक्तांचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. येथील सहायक आयुक्त डॉ. हरडे हे दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून सदर पद भरण्यात आले नाही. वरिष्ठ लिपीक व वर्णोपचाराचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. परिचराचे पद चार महिन्यांपासून रिक्त होते. ते नुकतेच भरण्यात आले. त्यामुळे या चिकित्सालयाची सर्व जबाबदारी एकट्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यांची सुध्दा लाखांदूर येथे बदली झाली आहे. मात्र त्यांना रिलिव्ह करण्यात आले नाही. रिक्त पदांमुळे पशु सेवेवर परिणाम होत आहे.