‘मेडीगड्डा’च्या जड वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाची ऐसीतैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:27 PM2019-04-22T22:27:31+5:302019-04-22T22:27:56+5:30

छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे या भागातील महामार्ग जागोजागी उखडून गेला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'Madigadda' heavy vehicles like the National Highway | ‘मेडीगड्डा’च्या जड वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाची ऐसीतैसी

‘मेडीगड्डा’च्या जड वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाची ऐसीतैसी

Next
ठळक मुद्देधोकादायक वाहतूक : क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांनी उखडला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे या भागातील महामार्ग जागोजागी उखडून गेला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर मार्गाची २००७ मध्ये बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) मार्फत बांधणी झाली होती. २०११ मध्ये हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. तत्कालीन कामाच्या दर्जामुळे दगदलपूर ते निजामाबाद हा जवळपास ६०० किलोमीटरचा मार्ग आजही तग धरून आहे. परंतू राजीवनगर ते कोत्तापल्ली, वडधमपर्यंतचा महाराष्ट्राच्या हद्दीतील जवळपास २६ किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे.
३५ टन वजन सहन करणाºया या मार्गावर मेडीगड्डा प्रकल्पाचे ७० टन वजनापर्यंतचे ट्रक बिनदिक्कतपणे अहोरात्र चालत आहेत. त्या भागातील रस्ता एवढे वजन सहन करू शकत नसल्याने उखडून जाऊन जागोजागी खड्डेमय झाला आहे. याचा त्रास गडचिरोली जिल्ह्यातील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
सिरोंचा शहरानजिक गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाच्या कामावरील जड वाहनांची वर्दळ सतत या रस्त्यावरून सुरू असते. रस्त्यावरून उडणारी धूळ आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन बºयाच लोकांना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले. पण रस्त्याच्या दुरूस्तीसाठी किंवा जड वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांत कोणीही पुढाकार घेतला नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती होण्याची शक्यता कमीच आहे.
दुरुस्तीचा खर्च मेडीगड्डा प्रकल्पाने द्यावा
विशेष म्हणजे याच मेडीगड्डा प्रकल्पाची जड वाहने तेलंगणा राज्यातूनही साहित्याची वाहतूक करतात. पण तेलंगणाच्या हद्दीत त्या वाहनांसाठी गुळगुळीत रस्ते बनविण्यात आले आहेत. मेडीगड्डा प्रकल्पाची वाहने जात असलेला एकही रस्ता तेलंगणाच्या हद्दीत खराब अवस्थेत दिसत नाही. मग महाराष्ट्राच्या हद्दीतील रस्त्यांसाठीच भेदभाव का? असा प्रश्न या भागातील नागरिक करीत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी कोणत्याही उपयोगाच्या नसलेल्या या प्रकल्पाने या भागातील चांगले रस्तेही खराब करून अनेकांचा बळी घेतल्याने या रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च मेडीगड्डा प्रकल्पाकडूनच वसूल करावा, अशीही मागणी काही सूज्ञ नागरिकांनी केली आहे.

मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे हा रस्ता जास्त खराब झाला आहे. या प्रकल्पाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी तात्पुरते खड्डे बुजवून त्यांच्या वाहनांची सोय केली होती. परंतू रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्याच्या पुनर्बांधणीची गरज आहे. या कामाला शासनाकडून मंजुरीही मिळाली आहे. निवडणूक आचारसंहितेनंतर त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल.
- अतुल मेश्राम,
कार्यकारी अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग विभाग

Web Title: 'Madigadda' heavy vehicles like the National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.