माेहफूल दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:43+5:302020-12-26T04:28:43+5:30
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापीत करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी ...
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापीत करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत.
माेहफुल दारू जाेमात
गडचिरोली : चंद्रपूरच्या दारूबंदी नंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून विकली जात आहे.
नळाला तोट्या नसल्यास कारवाई करा
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
आष्टी : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले आहेत.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलावात आता अतिक्रमण वाढले असून अस्वच्छता आहे.
अंकिसा मार्ग खड्डेमय
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
शौचालयांची दुरवस्था
गडचिरोली : शहरातील फुले वार्डात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. मात्र या शौचालयांची देखभाल व दुरूस्ती केली जात नाही. परिणामी सदर शौचालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.यावर खर्च केलेले हजारो रूपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे शाैचालयाची दुरूस्ती करावी.
झिंगानुरात कव्हरेज गूल
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर भागात भ्रमणध्वनी सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने या भागातील भ्रमणध्वनीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळीच दुसºयांशी संपर्क होत नसल्याने नागरिकांची कामे अडत आहेत. अनेक भ्रमणध्वनीधारक उंच जागेचा आधार घेत आहेत.
हस्तलिखित सातबारा द्या
देसाईगंज : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते.
पुलाअभावी अडचण
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. मात्र या भागाच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
सेवायाेजनकडे पाठ
गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र आता ऑनलाईन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगार नोंदणीसाठी कार्यालयात येत नाही. त्यामुळे सेवा योजन कार्यालय कुचकामी ठरत आहे
टोल फ्रीबाबत अनभिज्ञता
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नाही.
जीर्णाेध्दाराची प्रतीक्षा
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे.अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.